औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाचे नामांतरा विरोधातील याचिका निकाली
By दीप्ती देशमुख | Published: August 30, 2023 01:52 PM2023-08-30T13:52:21+5:302023-08-30T14:07:58+5:30
औरंगाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ४ ऑक्टोबरला तर उस्मानाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ५ ऑक्टोबरला
दीप्ती देशमुख, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: औरंगाबाद व उस्मानाबादच्या जिल्हा व महसूल विभागाच्या नामांतरणाला विरोध करणाऱ्या जनहित याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढल्या. तर दोन्ही शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी ऑक्टोबरमध्ये ठेवली आहे.
औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाच्या नामांतराबाबत राज्य सरकारने अद्याप अंतिम अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे या टप्प्यावर नामांतराला विरोध करणाऱ्या जनहित याचिका दाखल करून घेऊ शकत नाही, असे म्हणत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढल्या. परंतु, सरकारने अंतिम अधिसूचना काढल्यास याचिकाकर्त्यांना काही तक्रार असल्यास त्यांना पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.
मात्र, राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केल्याने न्यायालयाने दोन्ही शहरांच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले. औरंगाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ४ ऑक्टोबर तर उस्मानाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.