"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:20 IST2025-03-03T15:19:53+5:302025-03-03T15:20:12+5:30
अबू आजमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हटलं आहे

"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद
Abu Azmi on Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ऐतिहासिक चित्रपट संभाजी महाराजांच्या शौर्याचे चित्रण करत असूण तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही चित्रपटाचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई विषयी बोलताना अबू आझमी यांनी धक्कादायक विधान केलं आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी सपा नेते अबू आझमी हे देखील विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझासोबत बोलताना हे विधान केलं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा आशयाचे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबांमध्ये धर्माची लढाई नव्हती असंही वक्तव्य अबू आजमी यांनी केलं आहे.
"औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का," असा सवाल अबू आझमी यांनी केला.
"छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही," असंही अबू आझमी यांनी म्हटलं.
यावेळी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे केले ते योग्य होता का असा प्रश्न विचारला असता अहो याज्ञ यांनी उत्तर देण्यात टाळलं
तर अबू आझमी यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांना इतिहास माहिती नाही, असं प्रत्युत्तर भाजप आमदार राम कदम यांनी दिलं आहे. "अबू आझमी यांना इतिहाससंदर्भात पुस्तक भेट देणे आवश्यक आहे. ते उद्या सभागृहात येतील तेव्हा त्यांना मी इतिहासाचे पुस्तक भेट देईल. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा कसा छळ केला, त्यांना कसे कैदेत ठेवलं हे त्यांना माहिती नाही का," असा सवाल राम कदम यांनी केला.
"अबू आझमी यांना माहिती आहे की, छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला आहे. पण त्यांची ती राजकीय आवश्यकता असेल. त्यांना विशिष्ट अजेंडा पुढे घेऊन जायचा आहे. पण इतिहास हा कोणाच्या बापाला नाकारता येत नाही, अबू आझमी यांना तर अजिबात नाकारता येणार नाही," असंही राम कदम म्हणाले.