Abu Azmi: "औरंगजेब वाईट राजा नव्हता, त्याने कधीही हिंदू-मुस्लीम लढाई केली नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 10:09 AM2022-08-07T10:09:25+5:302022-08-07T10:12:45+5:30
भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार जलील यांना औरंगजेब हे तुमच्या मुलाचे नाव ठेवा, असा सल्ला दिला होता
मुंबई - राज्य सरकारने घेतलेल्या शहराच्या नामांतरणाला समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पहिल्यापासूनच विरोध दर्शवला आहे. एकीकडे अबू आझमी आणि दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही औरंगाबादचे नामांतर केल्यावरुन नाराजी व्यक्त करत विरोध केल्याचे दिसून येते. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापत असतानाच अबू आझमी यांनी खळबळजनक विधान केलं आहे. औरंगाबादमध्ये अनेक लोकांचं नाव औरंगजेब असून औरंगजेब हा वाईट राजा नव्हता, असे विधान अबू आझमी यांनी केले आहे.
भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार जलील यांना औरंगजेब हे तुमच्या मुलाचे नाव ठेवा, असा सल्ला दिला होता. त्यावरुन, आता अबू आझमी यांनी औरंगजेब हे औरंगाबादमधील अनेकांचे नाव असल्याचे म्हटले. ''औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही.'', असे अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
तरच मी नामांतराचे स्वागत करेन
''महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुस्लीम नाव आहे. ही तीन नावं बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचं स्वागत करेन'' असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे
भाजपा नेते रावसाहेब दानवे (BJP Raosaheb Danve) यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका केली. आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. "एमआयएमला माझा सवाल आहे की, तुम्हाला औरंगजेबबद्दल एवढं प्रेम का आहे? ज्यानं मराठवाड्यावर अन्याय केला, येथील लोकांना त्रास दिला, त्या औरंगजेबबद्दल तुम्हाला इतका पुळका येण्याचं कारण काय? सर्व महाराष्ट्र जाणतो, औरंगजेब काय होता? दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात, असे दानवे यांनी म्हटले आहे.