"औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक, राजकीय पोळी भाजण्यास इतिहासाचा वापर", राज ठाकरे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 07:09 IST2025-03-31T07:08:45+5:302025-03-31T07:09:56+5:30
Raj Thackeray News: औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक असून कबरीजवळील सजावट काढून तेथे मोठा फलक लावा की, मराठ्यांना हरवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली.

"औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक, राजकीय पोळी भाजण्यास इतिहासाचा वापर", राज ठाकरे यांची टीका
मुंबई - औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक असून कबरीजवळील सजावट काढून तेथे मोठा फलक लावा की, मराठ्यांना हरवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. शिवाजी पार्कवरील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते.
मूल प्रश्न सोडून आपल्याला औरंगजेबाची पडली आहे. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. त्यानंतर लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य कळते. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत, असा टोलाही राज यांनी लगावला.
जातीपातीत भिडवून द्यायला इतिहास सोपा आहे. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, त्यांना मराठ्यांनी साथ दिली, हे सगळे बोलणान्यांचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त पोळी भाजून घ्यायची आहे, अशी टीकाही राज यांनी केली.
पुरून उरलो..
अफझलखान प्रतापगडावर आला होता. त्याला पायथ्याशीच पुरला. त्याची कबर महाराजांना विचारल्याशिवाय बांधली गेली का? शक्यच नाही. ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करुन चालणार नाहीत. जगाला दाखवले पाहिजे आम्ही यांना इथे गाडलंय, आम्ही पुरून उरलो, असे राज म्हणाले.
... तर फडणवीसांना पाठिंबा
देवेंद्र फडणवीस यांना माझे आवाहन आहे. तुमच्या हाती चांगले राज्य आलेले आहे. मराठी माणसाचे हित पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.
कर्ज वाढेल, लाडकी बहीण योजना बंद होईल
लाडकी बहीण योजनेतून महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तसे केल्यास राज्यावर कर्ज होईल. त्यामुळे ही योजना बंद होणार, असेही राज म्हणाले.
धर्माच्या नावाखाली नद्या बरबाद करत आहोत
आपण धर्माच्या नावाखाली नद्या बरबाद करतोय. महाराष्ट्रातील ५५ नदीपट्टे धोक्याच्या पातळीवर आहेत. सर्वात प्रदूषित नद्यांमध्ये मिठी, उल्हास, मुळा, मुठा, सावित्री, चंद्रभागा, इंद्रायणी नद्या आहेत. मुंबईतील पाचपैकी चार नद्या मेल्या. पाचवी मिठी नदी मरायला आली. याविरोधात बोलल्यानंतर थर्म आडवा येणार, असे उत्तर राज यांनी दिले.