Join us

आषाढी एकादशी: मुंबईतही आषाढीचा उत्साह, चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 12:03 PM

लोकलच्या गर्दीत दररोज आपल्याच धुंदीत चालणारे पाय जेव्हा टाळ-मृदुंग पाहून थांबले

मुंबई - आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण राज्यातील वातावरण भक्तीमय बनले आहे. विठु-माऊलीचा जगर करत मराठी माणूस टाळ-मृदुंगा घेऊन विठ्ठलभक्तीत तल्लीन झाला आहे. चंद्रभागेतीरी विठ्ठल भक्त वैष्णवांचा मेळा जमला आहे. मात्र, लहानपणापासून गावाकडे आषाढी एकादशीची पूजा करणारे आणि पंढरपूरच्या वारीचे महत्व जाणून उपवास करणारे जेव्हा मुंबईत येतात, तेव्हाही आपल्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात. मुंबईतील चर्चगेट स्थानकावरही आज विठ्ठल भक्तीचा मळा फुललेला दिसला. 

लोकलच्या गर्दीत दररोज आपल्याच धुंदीत चालणारे पाय जेव्हा टाळ-मृदुंग पाहून थांबले, कानडा राजा पंढरीचा हे गाणे गाऊ लागले. माऊली माऊली करुन ऐकमेकांना नमस्कार करू लागले, पांडुरंगाचे दर्शन घेऊन लागले, तेव्हा चर्चगेट स्थानकातही भक्तीचा मळा फुलल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला जाऊन सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली. गेल्या महिनाभरापासून पंढरीकडे चालणारी पाऊलेही आज पांडुरंगाच्या दर्शनानंतर चंद्रभागेतीरी स्थिरावली. त्यामुळे या महासोहळ्याचं सेलिब्रेशन राज्यभर होत आहे. मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर अंगात धोतर, सदरा घालून आणि कपाळी बुक्क्याचा गंद लावून मुंबईकर भजनात दंग झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील आपल्या राहत्या ठिकाणाहून दिंडी घेऊन चर्चगेट रेल्वे स्थानकावर आल्याचे पाहायला मिळाले. तर चर्चगेट स्थानकावरील विठ्ठल भक्ताचा मेळा पाहून चाकरमान्यांची पाऊलेही थबकली होती. विठू माझा लेकुरवाळा... कानडा राजा पंढरीचा... माऊली माऊली... या गाण्यांनी चर्चगेट स्थानक परिसर दणाणून गेला होता. तर, मुंबईच्या डबेवाल्यांचाही उत्फुर्त सहभाग यामध्ये दिसला. विशेष म्हणजे हिंदी भाषिक रेल्वेचे अधिकारीही या सोहळ्यात दंग झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच वारकरी अन् माऊलींसाठी चहा आणि फराळाचा अल्पोपहारही काही स्थानिक संघटनांकडून देण्यात येत होता. 

चर्चगेट स्थानकावरील हा वैष्णवांचा मेळा गावची अन् पंढरीच्या पांडुरंगाची साक्ष देत होता. मुंबईकरांनाही आषाढी एकादशीच्या उत्सवाची महती येथील वारकरी नकळत सांगून जात होता.  

 

टॅग्स :आषाढी एकादशीपंढरपूर वारीमुंबईपंढरपूरलोकल