कर्करुग्णसेवेची जाज्वल्यपूर्ण पंच्याहत्तरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 02:05 AM2017-08-06T02:05:44+5:302017-08-06T02:28:48+5:30

परळ किंवा एल्फिन्सटन रोड (आता प्रभादेवी) रेल्वे स्टेशनवरून पूर्वेकडे जायला निघाल्यावर डॉ. आंबेडकर रोड मार्ग पार केल्यावर पुढे सुरू होतात अनेक हॉस्पिटल्स. केईएम हॉस्पिटल, महात्मा गांधी हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, हाफकिन इन्स्टिट्यूट.

Auspicious page of Cancer! | कर्करुग्णसेवेची जाज्वल्यपूर्ण पंच्याहत्तरी!

कर्करुग्णसेवेची जाज्वल्यपूर्ण पंच्याहत्तरी!

Next

- संजीव साबडे

परळ किंवा एल्फिन्सटन रोड (आता प्रभादेवी) रेल्वे स्टेशनवरून पूर्वेकडे जायला निघाल्यावर डॉ. आंबेडकर रोड मार्ग पार केल्यावर पुढे सुरू होतात अनेक हॉस्पिटल्स. केईएम हॉस्पिटल, महात्मा गांधी हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, हाफकिन इन्स्टिट्यूट.
आंबेडकर रोड क्रॉस करताच, एक रस्ता डावीकडे जातो. तिथे चालू लागल्यावर जरासं पुढे फुटपाथवर अनेक कुटुंबं दिसतात. ही तिथं कायम राहणारी नसल्यानं त्यांना हटवलं जात नाही. त्या कुटुंबातलं कोणी ना कोणी आजारी असतंच. काहींच्या नाकाला रुमाल बांधलेले असतात. चेहºयावर आजारीपणाची काही ना काही लक्षणं असतात... त्यांना पाहून काहीशी कणव येते आणि या आजाराच्या भीषणतेचा अंदाजही.
एका बाजूला एक उंच इमारत आणि दुसरीकडे तुलनेनं लहान इमारत. त्या दोन्ही इमारतींना जोडणारा पूल मधोमध. या दोन्ही इमारती टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या. कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करणारं हे भलंमोठं हॉस्पिटल. देशभरातून रोज रुग्ण इथं येतात. त्या सर्र्वाना दाखल करून घेणं शक्य नसतं आणि त्याची गरजही नसते. पण उपचारानंतर लगेच गावी जाणं शक्य नसतं अनेकांना. पुन्हा उपचार घ्यायचेच असतात. त्यामुळे ते तिथंच बिºहाड उभारतात. अशी असंख्य कुटुंबं वा रुग्ण फुटपाथवर राहतात. तिथं काही धर्मशाळा आहेत. पण तिथंही सर्वांना सामावणं शक्य नाही. राहायला मिळो वा न मिळो, या सर्वांचं एकच आशास्थान... टाटा मेमोरियल सेंटरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटल.
या हॉस्पिटलला यंदा ७५ वर्षं पूर्ण झाली आहेत. केवळ भारतातलंच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिलं कॅन्सर रुग्णालय. टाटा समूहाने देशभरात अनेक वेगवेगळ्या संस्थांची उभारणी केली. त्यापैकी टाटा कॅन्सर हॉस्पिटल एक. दोराबजी टाटा यांनी ट्रस्ट स्थापन करून, आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ या हॉस्पिटलची उभारणी केली. कॅन्सरवर उपचारच नव्हे, तर संशोधन व्हावं, संशोधनाचा फायदा रुग्णांना व्हावा, असा त्यामागील हेतू. त्याचं उद्घाटन २८ फेब्रुवारी १९४१ रोजी मुंबईचे गव्हर्नर सर रॉजर लुमले यांच्या हस्ते झालं आणि ३ मार्चपासून ते रुग्णांसाठी खुलं करण्यात आलं.
गेल्या ७५ वर्षांत देशा-परदेशांतील लाखो कॅन्सरच्या रुग्णांवर या हॉस्पिटलातून उपचार झाले. मधल्या काळात देशात असंख्य कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाली. पण कॅन्सर म्हणताच नाव समोर येतं ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं. इतकी विश्वासार्हता या नावानं दिली. कॅन्सर एके काळी अतिशय दुर्धर होता. तो झाला रुग्ण जगणार नाही, असंच वाटायचं. पण त्यावर संशोधन झालं. कॅन्सरचे अनेक प्रकार समोर आले. काही उपचारांद्वारे बरे होऊ लागले.
यासाठीच्या संशोधनात आणि रुग्णांना बरं करण्यात टाटा हॉस्पिटलचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच दरवर्षी ३0 हजार वा त्याहून अधिक नवे कॅन्सर रुग्ण तिथे तपासणी व उपचारांसाठी येत असतात. शिवाय जुन्या रुग्णांवर उपचार सुरूच असतात. तिथं होणाºया शस्त्रक्रियांची संख्याही हजाराच्या घरात आहे. याबरोबच कॅन्सर टाळता कसा
येईल, त्यासाठी काय करावं, यासाठीचा एक विभागही अनेक वर्षं कार्यरत आहे.
इतक्या महत्त्वाच्या संस्थेच्या प्रदीर्घ काळाच्या भरीव कामगिरीचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं असतं. ते संस्थेला ७५ वर्षं झाल्याच्या निमित्तानं झालं आहे. ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल : इनडेलिबल फूटप्रिंट्स आॅन द सॅण्ड्स आॅफ टाइम’ या नावानं. कॉफी टेबल बुक पद्धतीनं तयार करण्यात आलेला हा खरं तर ग्रंथच म्हणता येईल.
निशू सिंग गोयल यांनी हे तयार केलं आहे. असं यासाठी म्हणायचं की, इतक्या भल्या डॉक्युमेंट्सची उभारणी व लिखाण त्यांनी केलं. तरीही त्यांचा पुस्तकाविषयीचा दृष्टीकोन ‘इदं न मम’ (यात माझं काहीच नाही) असा आहे. कॉफी टेबल बुक टाटा हॉस्पिटलचा संपूर्ण इतिहासच उलगडून दाखवतं. या हॉस्पिटलच्या कार्याचा प्रत्येक टप्पा पुस्तकातून वाचायला आणि पाहायला मिळतो. साध्या साध्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात, त्या इथे कळतात.
भारतातील पहिली ब्लड बँक या हॉस्पिटलमध्ये सुरू झाली, अन्यत्र नसणारं मेडिकल सोशल सर्विस डिपार्टमेंट इथं आलं. भारतीयांमधील कॅन्सरविषयीचा, केमोथेरपीच्या परिणामांचा शोधनिबंध टाटामधील डॉ. व्ही. आर. खानोलकर यांनी लिहिला. त्यांच्या नावावर खरं तर असंख्य शोधनिबंध आहेत. डॉ. जसावाला यांच्या कामाची महती या ग्रंथामुळेच कळते. रेडिएशनचे परिणाम तपासण्यासाठी अ‍ॅटोमिक एनर्जी कमिशनने इथे सुरू केला यापासून इंडियन कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापनाही इथेच झाली, अशा अनेक बाबी पुस्तकातूनच कळतात.
डॉ. व्ही. आर. खानोलकर, डॉ. जसावाला यांच्यापासून अनेक तज्ज्ञांचाही हॉस्पिटलच्या उभारणीत मोठा वाटा आहे. त्या सर्र्वाचा आवर्जून उल्लेख यात आहे. तसंच १९४१ साली सुरू केलेल्या हॉस्पिटलच्या बेड्समध्ये हळुहळू वाढ होत गेली, पहिली मायक्रोव्हस्क्युलर सर्जरी झाली, अनेक प्रयोग होत राहिले, संशोधन आणि विकास कार्य करतानाच ग्रामीण भागांत कॅन्सरविरोधात काम सुरू केले, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये डॉ. बी. एम. नेने यांच्या पुढाकाराने रुग्णालय उभारले गेले, अशा टाटा कॅन्सरच्या यशस्वी कार्याचा आढावा हे कॉफी टेबल बुक घेते.
दोराबजी टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने सुरू झालेल्या हॉस्पिटलच्या वाढीत व विकासात टाटा कुटुंबातील प्रत्येकाचे महत्त्वाचे योगदान आहे. जे. आर. डी. टाटा, नवल टाटा, रतन टाटा यांनी या संस्थेच्या वाढीमध्ये आणि कामामध्ये बारकाईने लक्ष घातले आहे. होमी भाभा, होमी सेठना, विक्रम साराभाई, अनिल काकोडकर, पी. के. अय्यंगार, शेखर बसू आदींचेही हॉस्पिटलच्या विकास व वाढीमध्ये मोठे योगदान आहे.
हे हॉस्पिटल पुढे केंद्र सरकारकडे सोपविण्यात आलं. पण त्यामुळे आपला संबंध संपला, असं टाटांनी मानलं नाही. कॅन्सरविरोधातील ही लढाई आहे, असं समजून त्यांचं योगदान कायम राहिलं. पुस्तकाच्या पानापानावर या योगदानाच्या खुणा दिसतात. कदाचित त्यामुळेच टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे सरकारी आहे, असं कोणालाच वाटत नाही. अगदी आत प्रवेश केल्यावरही. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे ते सोपविण्यात आलं तरी त्यावर प्रशासकीय नियंत्रण आहे डिपार्टमेंट आॅफ अ‍ॅटोमिक एनर्जीचं. मात्र हस्तक्षेप, ढवळाढवळ, डॉक्टर, कर्मचारी यांच्या बदल्यांमध्ये राजकारण्यांचे हितसंबंध यापासून ते कायम दूर राहिलं आहे. इथं देशाचे सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती, अन्य देशांचे प्रमुख तसेच देशाविदेशांतील तज्ज्ञांनी वेळोवेळी भेटी दिल्या, याचं कारणच मुळी या अग्रगण्य संस्थेची महत्ता.
कॅन्सरचा अभ्यास व संशोधन यासाठी तिथे प्रशिक्षण केंद्र आहे. त्याला जागतिक आरोग्य संस्था, युनियन फॉर कॅन्सर कंट्रोल यांची मान्यता आहे. शिवाय मुंबई विद्यापीठ तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची संलग्नताही आहे.
आपल्याला बाहेरून त्या दोन जोडलेल्या इमारती म्हणजे केवळ कॅन्सरवर उपचार करणाºया हॉस्पिटलचा भाग वाटतात. पण हे केवळ हॉस्पिटल नव्हे. त्याहून अधिक योगदान आहे या इमारतींचं. ते आपल्याला कधीच कळणार नाही.
कॅन्सरविषयी मनात इतकी भीती असते की तो आपल्यालाच काय, कोणालाच होऊ नये, असं आपण म्हणतो. पण इतके वेगवेगळे रुग्ण तिथं तपासले जातात, त्यांच्यावर उपचार होतात, ते पाहून या संस्थेविषयी मनात अभिमानाची भावना निर्माण होते. जाज्वल्यपूर्ण रुग्णसेवेचा हा ऐतिहासिक ऐवज सर्वसामान्य वाचकांसाठी लहान पुस्तकरूपात विक्रीसाठी आल्यास कॅन्सरसंदर्भात होणाºया कामाचा प्रसार सर्व स्तरापर्यंत तर होईलच,
शिवाय जे रुग्ण इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत, अशांनाही एक नवा आशेचा किरण सापडेल, यात तीळमात्र शंका नाही.

संचालक
डॉ. राजेंद्र बडवे
टाटा कॅन्सरचे सध्याचे संचालक आहेत डॉ. राजेंद्र बडवे. कॅन्सरच्या संशोधनात मोठं नाव असलेला, आंतरराष्ट्रीय ख्याती असलेला एक मराठी माणूस तिथं संचालक असणं, ही बाबही अभिमानाची. त्यांच्याच काळात या हॉस्पिटलची ७५ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यांनी अनेक उपक्रमही राबवले. हे जे कॉफी टेबल बुक तयार झाले, त्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. डॉ. बडवे यांना गेल्या वर्षी लोकमत समूहातर्फे ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर- महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. शुभदा चिपळूणकर, एसीटीआरईसी
टाटा हॉस्पिटलचा महत्त्वाचा एक भाग म्हणजे अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रेनिंग, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर. संस्थेच्या नावातूनच तिथे कॅन्सरसंबंधीचे शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण दिले जाते, हे स्पष्ट होते. त्या संस्थेच्या प्रमुखही डॉ. शुभदा चिपळूणकर ही मराठी व्यक्ती आहे. या ग्रंथाच्या कामात त्यांचा मोठा वाटा आहे. ग्रंथाच्या लेखिका निशू सिंग गोयल यांनी तसा उल्लेखही केला आहे.

Web Title: Auspicious page of Cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.