Join us

विमानतळ सुरक्षेबाबत प्राधिकरण असंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:32 AM

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेबाबत विमानतळ प्राधिकरण (एएआय) असंवेदनशील असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने एएआयला गुरुवारच्या सुनावणीत धारेवर धरले.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेबाबत विमानतळ प्राधिकरण (एएआय) असंवेदनशील असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने एएआयला गुरुवारच्या सुनावणीत धारेवर धरले.विमानतळाच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन होऊ नये व विमानतळावर दहशतवादी हल्ला होऊ नये, यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई विमानतळ प्राधिकरण व एएआयला दिले आहेत. तसेच महापालिका आणि डीजीसीएलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे. विमानतळाच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन संबंधित प्राधिकरणच करत नसल्याचा आरोप व्यवसायाने वकील असलेले यशवंत शेणॉय यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.गुरुवारच्या सुनावणीत एएआयने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाने गेल्या सुनावणीत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन या प्रतिज्ञापत्रात करण्यात आले नाही, असे न्यायालयाने म्हटले.‘विमानतळ आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असतानाही एमएआर एवढे असंवेदनशील कसे असू शकते?’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.