सत्ताधाऱ्यांनी पुसली डबेवाल्यांच्या तोंडाला पाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:07 AM2021-09-27T04:07:43+5:302021-09-27T04:07:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभावी वृत्तीमुळे जगभरात नावलौकिक असलेल्या डबेवाल्यांच्या सन्मानार्थ मुंबईत ‘डबेवाला भवन’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभावी वृत्तीमुळे जगभरात नावलौकिक असलेल्या डबेवाल्यांच्या सन्मानार्थ मुंबईत ‘डबेवाला भवन’ उभारण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यातून दिले होते. जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत, पालिका प्रशासनाने यातून अंग काढून घेतल्याने डबेवाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘इस्टेट’ विभागाकडे जागेची अनुपलब्धता आणि विकास आराखड्यात राखीव जागा न ठेवल्याने ‘डबेवाला भवना’साठी जागा उपलब्ध करून देऊ शकत नसल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. डबेवाल्यांनी आक्षेप घेतला आहे. याविषयी बोलताना मुंबई डबेवाले संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळडोके म्हणाले, शिवसेनेने पालिका निवडणुकीच्या वेळी जाहीनाम्यात डबेवाला भवन उभारण्यासह पाच कोटींचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. मुंबईच्या जडणघडणीत डबेवाल्यांचे योगदान आणि १०३ वर्षांची कारकिर्द विचारात घेऊन आश्वासनपूर्ती होईल, अशी आशा होती, परंतु पालिका प्रशासनाच्या भूमिकेमुळे अपेक्षांना सुरुंग लागला आहे. आमच्या भाबडेपणा, अशिक्षितपणाचा फायदा राजकीय पक्षांनी घेतल्याची भावना समस्त डबेवाल्यांच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले.
...........
उद्योगपतींना कशी जागा मिळते?
कष्टकरी वर्गाची दखल न घेण्याची राजकीय मनोवृत्ती हल्ली बळावत चालली आहे. डबेवाल्यांच्या हक्काची वास्तू उभी राहावी, यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडे पाठपुरावा केला, पण दखल कोणी घेतलीच नाही. डबेवाला भवनासाठी जागा नाही, मग उद्योगपती, विकासकांना सहजासहजी जागा कशी काय उपलब्ध होते, असा सवाल काळडोके यांनी उपस्थित केला. मोठ्या भूखंडाची मागणी मुळीच केली नव्हती. आमच्या हक्काची वास्तू उभी राहण्यापुरती जागा मिळावी, इतकीच अपेक्षा होती, असेही त्यांनी सांगितले.
........
पालिका प्रशासनाच्या भूमिकेमुळे डबेवाल्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आतापर्यंत आश्वासने देऊन ज्यांनी आम्हाला बांधून ठेवले होते, त्यातून आज आम्ही मुक्त झालो. येत्या काही दिवसांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहोत. कोणीच मदत केली नाही, तर वर्गणी काढून आमच्या हक्काची वास्तू उभारू, असा संकल्प आम्ही सोडला आहे.
- विष्णू काळडोके, प्रवक्ता, मुंबई डबेवाले संघटना.
.......
डबेवाल्यांचा मानस काय ?
मुंबईच्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य अभ्यासण्यासाठी जगभरातून विद्यार्थी आणि मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी येत असतात, परंतु मोठी जागा उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना फुटपाथवर उभे राहून प्रशिक्षण द्यावे लागते. त्यासाठी हक्काची वास्तू असावी, शिवाय डबेवाल्यांचे कार्यकर्तृत्व, आतापर्यंतची स्थित्यंतरे, जडणघडण याविषयी माहितीपर संग्रहालय असावे. किंबहुना, भक्ती, युक्ती आणि शक्तीच्या संगमाचे हे प्रतीक असावे, असा डबेवाल्यांचा मानस आहे.