लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे संगोपन, संरक्षणासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. त्यासंबंधीचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला. जिल्हास्तरावर टास्क फोर्सही नेमण्यात आले. मात्र, अशा अनाथ मुलांची माहिती मिळवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मोठे आवाहन सध्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांसमोर आहे. मुंबईत आतापर्यंत केवळ ४४ बालकांचीच माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे हा शोध अधिक व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम लहान बालकांवरही होत आहे. काही प्रसंगात कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी छोट्या कुटुंबातील पालक कोरोनाग्रस्त झाल्यावर मुलांचा ताबा, संगोपनाचा प्रश्नही निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश विभागाने दिले होते. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आले आहेत.
मात्र, समित्या स्थापन होऊन त्यांची पहिली बैठक झाली असली तरी अनाथ बालकांची माहिती मात्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेली नाही. मुंबई शहर जिल्ह्यात अवघा एक, तर उपनगर जिल्ह्यात ४३ असे एकूण ४४ बालके आतापर्यंत आढळून आलेले आहेत. टास्क फोर्सपर्यंत बालकांची माहिती पोहोचावी यासाठी जनजागृतीचे काम हाती घेण्यात येत आहेत.
----
कोविडमुळे पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मृत व्यक्तींची माहिती जमा केली जात आहे. कोविड हाॅस्पिटल, जंबो सेंटरमधूनही माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. शिवाय, अंगणवाडी सेविका, बालविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर, वस्ती स्तरावर पोहोचण्याची आमची योजना आहे. याशिवाय, हँडबिल, भित्तीपत्रके तयार केली आहेत. या विषयात अधिकाधिक जनजागृती करून माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.
- प्राजक्ता देसाई, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, मुंबई उपनगर
बालकांबाबत माहिती देण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चाईल्ड हेल्प लाईन
१०९८ (२४ तास)
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
०२२-२५२३२३०८ / ९७०२९६२०२५
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई उपनगर
०२२-२५२३२३०८ / ९१३६८९९८९१
बाल कल्याण समिती -१ (मुलुंड ते मानखुर्द)
९९६७८१४७१७
बाल कल्याण समिती -२ (बांद्रा ते दहिसर )
८७७९५०३६१२
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई शहर ०२२-२४९२२४८४,
बाल कल्याण समिती, मुंबई शहर १ व २ – ९३२४५५३९७२, ९८६७७२८९९४