'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली
By मोरेश्वर येरम | Published: January 1, 2021 02:28 PM2021-01-01T14:28:15+5:302021-01-01T14:30:03+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे आभार व्यक्त केले.
मुंबई
"राज्यातील पोलिसांचं कर्तृत्व हे सूर्यप्रकाशा एवढं मोठं आणि स्वच्छ आहे. माझ्या बहाद्दर लोकांच्यासोबत वेळ घालवायला मी आलो आहे", अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी आज नववर्षाचं स्वागत मुंबई पोलिसांसोबत मुंबई पोलीस आयुक्तालयात केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं. "पोलीसंही माणसं आहेत. पण तरी तुम्ही दक्ष राहता, म्हणून आम्ही सण साजरे करू शकतो. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक नागरिक म्हणून तुमचे आज आभार मानतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पोलिसांनी 'वर्क फ्रॉम होम' केलं असतं तर?
"कोरोनामुळे आपण राज्यातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन केलं. घरातून काम करण्याचे म्हणजेच 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश दिले. पण विचार करा जर पोलिसांनीही 'वर्क फ्रॉम होम' केलं असतं तर? अजूनही धोका गेलेला नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सर्वच उघडलं तर चुकीचं ठरेल", असं मुख्यमंत्री म्हणाले.
पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लागणार नाही
"पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण तुमच्या कर्तृत्वाला कशाचीच तोड नाही. ही परंपरा १०० ते १५० वर्षांपासूनची आहे. त्यामुळे कुणीही कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कुणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे", असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.