कच्चा मालाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:06 AM2021-02-13T04:06:32+5:302021-02-13T04:06:32+5:30

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा फटका ...

An authority should be set up to control the prices of raw materials | कच्चा मालाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करावी

कच्चा मालाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करावी

Next

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा फटका बांधकाम क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसला. विशेष म्हणजे बांधकाम करण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो, त्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परिणामी घरांच्या किमतीदेखील वाढल्या आणि बांधकाम उद्योगाला याचा फटका बसू लागला. आता यातून सावरण्यासाठी सिमेंट आणि स्टील यासारख्या कच्च्या मालाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी विकासकांकडून जोर धरू लागली आहे.

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई सेंटरचे आनंद गुप्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आज सिमेंट आणि स्टील यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. या किमती नियंत्रित राहिल्या पाहिजेत किंवा कमी झाल्या पाहिजेत, याबाबतची कारवाई करण्यासाठी सिमेंट आणि स्टील नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.

दुसरीकडे केंद्राकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पात बांधकाम उद्योगाला दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, किंचित काही घटक सोडले तर प्रत्यक्षात तसा फायदा झालेला नाही. शिवाय आता जमिनीच्या किमती वाढत आहेत, कर वाढत आहेत, कच्चा मालाच्या किमतीही वाढत आहेत. मजूर मिळेनासा झाला आहे आणि मिळाला तरी त्याचे वेतन परवडत नाही. याचा परिणाम घरांच्या किमतीवर होत आहे. घरे महाग झाल्याने त्यांची विक्री होत नाही तसेच परवडणारी घरे बांधणेही परवडत नाहीत, अशी बांधकाम उद्योगाची अवस्था आहे.

दरम्यान, या क्षेत्रातील कच्चा मालाच्या किमती वाढल्या आहेत. याबाबत अर्थसंकल्पात काहीही दिलासा मिळालेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी याबाबत मध्यंतरी बोलले होते. मात्र, दिलासा मिळाला नाही. आता हळूहळू मोठ्या प्रमाणावर कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे कच्च्या मालाची म्हणजे स्टील आणि सिमेंटची मागणी वाढली आहे. जेव्हा उत्पादन वाढेल तेव्हा त्याच्या किमती पुढील दोन ते तीन महिन्यात निश्चितच खाली येतील, असा विश्वास विकासकांना आहे.

Web Title: An authority should be set up to control the prices of raw materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.