Join us  

‘म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील अपात्र रहिवाशांना अधिकृत करा’

By admin | Published: October 23, 2015 3:17 AM

म्हाडाच्या शहर आणि उपनगरातील संक्रमण शिबिरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असलेल्या अपात्र रहिवाशांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे.

मुंबई : म्हाडाच्या शहर आणि उपनगरातील संक्रमण शिबिरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असलेल्या अपात्र रहिवाशांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. शासनाने २000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर अनेक वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्या अपात्र रहिवाशांनाही पात्र करण्यात यावे, अशी मागणी रहिवासी उत्कर्ष संघाच्या वतीने गृहनिर्माणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाची ५६ संक्रमण शिबिरे आहेत. सेसप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना येथील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. दलालांनी रहिवाशांकडून पैसे घेऊन त्यांना संक्रमण शिबिरातील घराचा ताबा दिला. या रहिवाशांना अपात्र ठरवून त्यांना घराबाहेर काढण्याची कारवाई म्हाडामार्फत करण्यात येणार होती. मात्र, म्हाडाने धोरण निश्चित करून घुसखोरांकडून दरमहा ३ हजार रुपये भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.या भाडेदरानुसार रहिवाशांकडून भाडे वसूल करण्यात येत आहे. परंतु या रहिवाशांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय म्हाडाने घेतलेला नाही. म्हाडा अधिकारी आणि दलालांमार्फत सुमारे दहा हजार कुटुंबांना संक्रमण शिबिरात घरे देण्यात आली आहेत. हे रहिवासी अनेक वर्षांपासून तेथे राहत असल्याने त्यांना पात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी रहिवासी उत्कर्ष संघाच्या वतीने गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्याकडे करण्यात आली आहे. शासनाने २000 पर्यंतच्या झोपड्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर या रहिवाशांनाही पात्र ठरवून त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी संघाचे सल्लागार आॅल्विन दास यांनी केली आहे. त्याचप्रमाणे प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरांमध्ये अनेक वर्षांपासून राहत असलेल्या रहिवाशांचीही मास्टर लिस्ट तातडीने जाहीर करावी. तसेच येथे शाळा, दवाखाना, भाजी मार्केट आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी दास यांनी गृहनिर्माण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.