लेखकांच्या लेखनातून संपादक शिकत जातो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:27 AM2017-12-26T02:27:30+5:302017-12-26T02:27:33+5:30
मुंबई : आत्मभान आणि समाजभानाची आठवण राहण्यासाठी, तसेच केवळ वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून मी दिवाळी अंक काढत आलो आहे.
मुंबई : आत्मभान आणि समाजभानाची आठवण राहण्यासाठी, तसेच केवळ वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून मी दिवाळी अंक काढत आलो आहे. अंकात कोणते लेखन असावे, यापेक्षा कोणते लेखन असू नये, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असते. अंकात लिहिणाºया अनेक लेखकांच्या लेखनातून संपादक शिकत जातो आणि विविध अनुभवांतून संपादक घडत जातो, असे उद्गार ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते यांनी काढले. ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘असेही एक साहित्य संमेलन’ या साहित्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. मराठीतील दिवाळी अंक, अशी या सोहळ्याची मध्यवर्ती कल्पना होती. अरुण शेवते संपादित ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत, आयोजक अशोक मुळ्ये यांनी त्यांना या संमेलनाचे अध्यक्षस्थान बहाल केले होते. ज्येष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, तर ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून उतरलेला ‘माझा पुरस्कार’ या वेळी मान्यवरांना प्रदान करण्यात आला.
दिवसेंदिवस दिवाळी अंक चालविणे कठीण होत चालले आहे, पण लेखक व संपादकच यात कमी पडतात. अरुण शेवतेंना मात्र, २५ वर्षे दिवाळी अंक काढणे चांगले जमले आहे. दिवाळी अंक वाचनालयांमध्ये काही जपून ठेवले जात नाहीत. दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर काही काळाने त्यांचे काय होते, याचा विचार संपादकांनी केला पाहिजे, अन्यथा दिवाळी अंकांची परंपरा खंडित होईल. दिवाळी अंकांची आपण जपणूक करायला हवी, अशी भूमिका रविप्रकाश कुलकर्णी यांनी या वेळी मांडली.
‘नवीन पिढीच्या आकांक्षा व भाषा साहित्यिकांनी लक्षात घेतली नाही, तर ते साहित्य कोण वाचेल? आजची पिढी ‘नेट’वर साहित्य वाचते. त्यामुळे छापील पुस्तकासाठी आग्रह कशासाठी? ‘नेट एडिशन’ने पुढची पिढी साहित्याकडे अधिक आकर्षित होईल’ असे स्पष्ट करत, साहित्य संमेलनात अडीच ते तीन कोटींची पुस्तके विकली जात असतील, तर ‘लोक वाचत नाहीत’ असे प्रकाशकांना का वाटते, असा प्रश्न भारतकुमार राऊत यांनी या वेळी उपस्थित केला. या संमेलनाला लेखक व प्रकाशकांसह शरद पोंक्षे, हृषिकेश जोशी, सुनील बर्वे, विजय कदम, निर्मिती सावंत, अमृता सुभाष आदी कलावंत मंडळींनीही हजेरी लावली होती. ‘अवलिया व्यक्तिमत्त्व’ म्हणून नाट्यसृष्टीत परिचित असलेल्या अशोक मुळ्ये यांच्या शाब्दिक चौकार व षटकारांनी अपेक्षेप्रमाणेच या संमेलनात बहार आणली.
>‘माझा पुरस्कार’ वितरण सोहळा...
अशोक मुळ्ये यांनी निर्माण केलेला ‘माझा पुरस्कार’ या वेळी मान्यवरांना प्रदान करण्यात आला. ‘ऋतुरंग’ने पंचविशी गाठल्याबद्दल अरुण शेवते, कर्करोगावर यशस्वी मात करत, ‘कॅलिडोस्कोप’ या कथासंग्रहाचे लेखन करणारी युवा लेखिका सृष्टी कुलकर्णी, तसेच दिवाळी अंकाचा मोठ्या प्रमाणावर खप करणाºया ‘झी’च्या चमूला या वेळी ‘माझा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सृष्टी कुलकर्णी म्हणाली, ‘माझी जगण्याची उमेद कधीच संपली नाही. पेन व कागदाच्या माध्यमातून मला आयुष्याची नवी उमेद मिळत गेली. या पुरस्काराने मला ओळख मिळाली आहे आणि त्याचबरोबर, ‘मुळ्ये आजोबा’सुद्धा मिळाले आहेत.’