Join us  

स्वमग्न (ऑटिस्टिक) विद्यार्थ्यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन!

By सीमा महांगडे | Published: September 05, 2022 8:32 PM

विशेष मुलांची सामाजिक वर्तवणुक आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे गरजेचे!

Lalbaugcha Raja: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील सुमारे १०० स्वमग्न मुलांनी त्यांच्या पालकांसह आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर त्यांनी माटुंगा येथील जीएसबी गणरायाचेही दर्शन घेतले. चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ही स्वमग्न (ऑटिझमग्रस्त) मुलांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या तसंच त्यांच्या शैक्षणिक समस्यांबाबत सखोल मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेने विशेष मुलांसाठी हे गणराय दर्शन घडवून आणले. चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ही संस्था गेली १२ वर्ष स्वमग्न मुलांना लालबागच्या राजाचे दर्शन घडवते. "स्वमग्न मुलांना समाजात मिसळणे अधिक सोपे जावे, तसंच त्यांच्यात सामाजिक संवाद कौशल्य विकसित व्हावीत हा यामागचा हेतू आहे. पण गेली दोन वर्ष करोना महसाथीमुळे हे शक्य झाले नव्हते", अशी माहिती चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक संचालक, ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी दिली.

ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे पुढे म्हणाले, "स्वमग्न मुलांच्या वर्तवणुकीच्या काही विशिष्ट समस्या असतात. त्यांना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे सहजतेने इतरांमध्ये मिसळता येत नाही. त्यामुळे पालक त्यांना सामाजिक कार्यक्रमांमध्ये घेऊन जाण्याचे टाळतात. त्यामुळे या मुलांमध्ये आणखी भीती निर्माण होते. याउलट, जे पालक आपल्या मुलांना समाजातील लहान मोठ्या कार्यक्रमांत सहभागी करून घेतात त्यांच्या मुलांचा विकास तुलनेने अधिक वेगाने होतो." लालबागचा राजा आणि जीएसबी गणपती मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. सुमित शिंदे यांनी आभार मानले.

टॅग्स :गणेशोत्सवलालबागचा राजामुंबई