मुंबई : अगस्त्य आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान व सिनॉप्सीस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या जाणाऱ्या अन्वेषण स्पर्धेची तिसरी आवृत्ती अन्वेषणा- २०२१, १० मार्च रोजी संपन्न झाली. ऑगस्ट २०२० मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी १ ते १० मार्च या कालावधीत पार पडली. एकूण १४० प्रकल्पांमधून दोन टप्प्यात झालेली चाचणी पार करत ४१ प्रकल्प अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थी प्रकल्प सादर करतात. त्यामुळे ज्ञानाची देवाण-घेवाण होऊन विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होते. ते स्वतः नवीन प्रयोग करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कॉलेज विद्यार्थ्यांकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच सादरीकरण, परीक्षक फेरी, उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन माध्यमाद्वारे पार पडली. १ मार्च ते ६ मार्च या कालावधीत ३ सदस्यांच्या परीक्षक मंडळाने विद्यार्थ्यांचे प्रकल्प ऑनलाईन माध्यमाद्वारे समजून घेतले. परीक्षण केले व १० प्रकल्पांची अंतिम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीमध्ये लोकमान्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व आदर्श विद्यालय, गोरेगाव या संघाच्या आयओटी आधारित स्वयंचलित घर या प्रकल्पाला प्रथम, कोल्हापूरच्या केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व प्रायव्हेट हायस्कूल यांच्या ऑटोमॅटिक वॉटर रोव्हर या प्रकल्पाला द्वितीय, तर एस.आय.ई. एस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नेरुळ व श्री समर्थ विद्यालय, जोगेश्वरी यांच्या ब्रिज मॉनिटरिंग सिस्टीम प्रकल्पाला तृतीय पारितोषिक मिळाले, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक अमोल नामजोशी यांनी दिली.