तंत्रस्नेही भावांनी विकसित केले सामान्यांसाठी मोफत ॲप्लिकेशन
सीमा महांगडे
मुंबई : पहाटेचे साडेचार वाजले होते, अचानक मोबाईलच्या नोटिफिकेशन टोनचा आवाज आला आणि शार्दूल झोपेतून जागा झाला. आदल्या दिवशीच्या संध्याकाळी जवळच्याच पालिका शाळेतील लसीकरण केंद्रात स्लॉट उपलब्ध झाल्याने त्याने, त्या दिवशीसाठी स्लॉटची नोंदणी केली आणि तो पुन्हा झोपला. लसींच्या स्लॉट नोंदणीसाठी तासन्तास मोबाईलवर घुटमळत बसावे लागत असताना शार्दुलला मात्र जास्त प्रयत्न करावे लागले नव्हते. त्याने प्रथमेश आणि अभिषेक घरत या तंत्रस्नेही तरुणांनी शोध लावलेल्या स्लॉट चेकिंग ॲपचा वापर यावेळी नोंदणीसाठी केल्याने त्याला मोबाईलवर लक्ष ठेवून बसावे लागले नाही. या मोफत ॲप्लिकेशनचा वापर करून लसीकरण नोंदणी करताना येणारे अडथळे किंवा नोंदणी केल्यानंतर वारंवार टाकण्यात येणारा तपशील यापासून सुटका हाेईल.
लसीकरणाची नोंदणी कोविन ॲपवर करताना स्लॉट नोंदणीसाठी प्रयत्न करण्याआधीच अनेकदा बुकिंग फुल्ल झाल्याचे मेसेज येतात. अनेकदा वय, पिनकोड, जिल्हा पुन्हा पुन्हा टाकून पहावे लागते. स्लॉट नोंदणीसाठी सामान्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रथमेश आणि अभिषेक घरत या भावांनी आपल्याकडील तंत्रस्नेही कौशल्याचा वापर करत ऑटो-वैक-सैक (ऑटोमॅटिक व्हॅक्सिनेशन स्लॉट अव्हेलबेलिटी चेकर) नावाचे ॲप्लिकेशन विकसित केले. जेणेकरून एकदा नोंदणी केल्यावर ते ॲप्लिकेशन नोंदणीसाठी स्वतः सजग राहते आणि स्लॉट नोंदणीवेळी आपोआप रिमाइंडर देऊन ऑटो फिल्टर प्रक्रियाही करते. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करण्याची गरज नसून एका लिंक क्लिकवर उपलब्ध आहे. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरवरही लिंक ओपन होईल. महत्त्वाचे म्हणजे या लिंकमध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती विचारली जात नाही किंवा ती जतन करून ठेवण्याची परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे हे सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित ॲप्लिकेशन असल्याची माहिती अभिषेक यांनी दिली. लवकरच ते प्ले स्टोअरवरही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असलेल्या या तंत्रस्नेही भावांनी याआधी पालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला व्होटर सर्च इंजिन बनवून देण्यात मदत केली होती. त्यासाठी ते निवडणूक आयोगाच्या कौतुकालाही पात्र ठरले होते. कोविन ॲपवर ऑटो प्रॉग्रॅमिंग इंटरफेस पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असल्याने हे ॲप्लिकेशन लाँच करताना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता भासली नसल्याची माहिती अभिषेक याने दिली. याचमुळे १० मे ला या ॲप्लिकेशनची सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत ३५०० लोकांनी याचा वापर करून घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि त्याचा लाभ घ्यावा. जेणेकरून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून प्रत्येकाला सुरक्षित राखता येईल. विशेष म्हणजे तंत्रस्नेही नसलेल्या लोकांनाही याचा त्रास न होता लसीकरण नोंदणी सोपी व्हावी हा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.