वाडीबंदर येथील स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटमुळे प्रवाशांच्या सेवेसाठी स्वच्छ व नीटनेटकी ट्रेन उपलब्ध होऊन कोच साफ करण्यात वेळ व पाण्याची बचत होईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सांगितले. मध्य रेल्वेने नुकताच ‘रेल्वे सप्ताह -२०२१’ साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सन २०२०-२१ मध्ये लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान मध्य रेल्वेवर करण्यात आलेल्या ६२ दशलक्ष टनांच्या मालवाहतुकीसाठी रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. श्रमिक विशेष, विशेष ट्रेन इत्यादी चालविण्याचे तसेच मध्य रेल्वेच्या ८० पेक्षा जास्त ठिकाणी पायाभूत कामे पूर्ण केल्याबद्दल सुद्धा त्यांनी कौतुक केले.
भारतातील रेल्वेला प्रारंभ झाल्याच्या प्रीत्यर्थ दरवर्षी १० एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत रेल्वे सप्ताह साजरा केला जातो. यादिवशी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरिबंदर (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते तन्ना (ठाणे) पर्यंत ३३ कि.मी. अंतरावर पहिली रेल्वेगाडी धावली. ६६व्या रेल्वे सप्ताहाच्या दरम्यान, मध्य रेल्वेने गेल्या वर्षातील केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला जातो, असामान्य आणि अपवादात्मक सेवा केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिले जातात, आगामी वर्षासाठी नियोजन आखले जाते.