Join us

‘स्वयंचलित’चा घोळ कायम

By admin | Published: March 17, 2015 1:29 AM

मोठा गाजावाजा करत स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल प्रवाशांसाठी रविवारपासून सेवेत आणण्यात आली.

मुंबई : मोठा गाजावाजा करत स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल प्रवाशांसाठी रविवारपासून सेवेत आणण्यात आली. मात्र महिला प्रवाशांच्या फर्स्ट क्लास डब्याला बसविण्यात आलेल्या स्वयंचलित दरवाजा लोकलला रविवारी गर्दीच मिळाली नाही. त्यामुळे सोमवारपासून ही लोकल नियमितपणे सेवेत दाखल होईल आणि गर्दीच्या वेळेत त्याची खरी कसोटी दिसून येईल, असे वाटत असतानाच या लोकलची रवानगी कारशेडमध्ये करण्यात आली. स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल मंगळवारपासून पुन्हा सेवेत येईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यानुसार पश्चिम रेल्वेवरील एका लोकलच्या फर्स्ट क्लास महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवून त्याची महालक्ष्मी कारशेडमध्ये चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी चर्चगेट ते बोरीवली चाचणी घेण्यात आली आणि रविवारपासून लोकल सेवेत आणत असल्याचे रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी सांगितले. रविवारी दुपारी १२.१२ वाजता चर्चगेटवरुन सुटलेल्या या लोकलच्या एका फर्स्ट क्लास महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा असल्याने प्रवेश करताना किंवा डब्यातून बाहेर पडताना अनेक महिला प्रवाशांची तारांबळ उडत होती. दोन्ही बाजूला दरवाजा बंद असल्याने स्थानक आल्यास त्याचा प्लॅटफॉर्म नेमका कोणत्या बाजूला येतो हे काही महिला प्रवाशांना ओळखता येत नव्हते. काही वेळेला तर हे दरवाजे बंद होण्यास वेळही लागत होता तर काही वेळेला स्वयंचलित दरवाजे त्वरीत बंद होत होते. एकूणच महिला प्रवाशांची त्रेधातिरपिट उडत होती. सोमवारपासून ही लोकल गर्दीच्या वेळेत नियमितपणे धावेल, असे वाटत असतानाच ती देखभाल आणि दुरुस्तीसाठी महालक्ष्मी कारशेडमध्ये पाठविण्यात आली. मुळात सोमवारपासून कामाचा दिवस सुरु होत असल्याने गर्दीच्या वेळेत ती धावणे अपेक्षित होते आणि याच वेळेत लोकलला प्रतिसाद मिळणार होता. मात्र तसे झाले नाही. अखेर ही लोकल सोमवारी संध्याकाळपासून किंवा मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत येईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. गर्दीच्या वेळेत त्याची खरी कसोटी दिसून येईल, असे वाटत असतानाच या लोकलची रवानगी कारशेडमध्ये करण्यात आली. स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल मंगळवारपासून पुन्हा सेवेत येईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.