Join us

बीकेसीत धावणार स्वयंचलित पाँड कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:36 PM

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था येणार फास्ट ट्रॅकवर

मुंबई : जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र म्हणून नावारूपास येत असलेल्या बांद्रा कुर्ला काँम्लेक्समधिल (बीकेसी) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आजही सुमार दर्जाचीच आहे. प्रवासासाठी लागणारा वेळेसह इंधन आणि पैशाचा अपव्यय होत असून प्रदूषणातही भर पडत आहे. ही कोंडी फोडून बीकेसीला फास्ट ट्रँकवर आणण्यासाठी स्वयंचलित पाँड कार या भागात लवकरच धावण्याची चिन्हे आहेत. ही आँटोमेटेड रँपिड ट्रान्झिट सिस्टिम (एआरटी) सुरू करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत.    

मुंबईतील झपाट्याने विकसित होत असलेल्या बीकेसी या व्यावसायिक केंद्रात दिवसाकाठी चार लाख लोक ये जा करतात. जगातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या रस्त्यांपैकी एक असलेला पश्मिम द्रुतगती मार्ग बीकेसीला जोडला गेलेला आहे. त्यामुळे या भागात वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. मात्र, या भागात ये- जा करणा-या लोकांसाठी विद्यमान वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. सध्या बीकेसी परिसरात येणासाठी कुर्ला रेल्वे स्टेशनहून रिक्षा, टँक्सी किंवा बेस्टच्या बसचा पर्याय उपलब्ध आहे. चुनाभट्टी ते बीकेसी हा फ्लायओव्हर सुरू झाला असला तरी एमटीएनएल जंक्शन ते कुर्ला स्टेशन हे अंतर पार करण्यासाठी खासगी वाहने, रिक्षा टँक्सीला १५ ते २० मिनिटे तर बसला २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो. कलानगर येथे दोन पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्यामुळे बीकेसीतील अंतर्गत प्रवासी सेवा अपेक्षेएवढी वेगवान होईल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने एआरटीचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शुन्य कार्बन उत्सर्जनाच्या तत्वावर धावण-या या अद्ययावत आणि स्वयंचलित प्रवासी सेवेची आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता तपासण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

या प्रगत वाहतूक व्यवस्थेचा रुट कसा असावा, त्याची उभारणी कशा पध्दतीने करावी, त्यांची क्षमता किती प्रवासी वहनाची असेल, त्या सेवेतून किती उत्पन्न मिळेल, आर्थिकदृष्ट्या ही सेवा कशी व्यवहार्य ठरेल, त्यासाठी जगभरात अस्तित्वात असलेल्या कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल अशा विविध आघाड्यांवरील सखोल सर्वेक्षण करण्यासाठी एमएमआरडीए सल्लागाराची नियुक्ती करणार आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या महत्वाकांक्षी योजनेती पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

 

सुरक्षित आणि वेगवान प्रवास : तीन ते सहा प्रवाशांची ने आण करणा-या या पाँड कार स्वयंचलित असतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जाणार असून त्यासाठी कोणतेही इंधन किंवा बँटरीची गरज भासणार नाही. या प्रवासासाठी ठराविक अंतरांवर स्टेशनची उभारणी केली जाईल. वशिष्ठ ठिकाणी जाणा-या प्रवाशांना दरम्यानची स्टेशन बायपास करता येईल. कमी प्रवाशांची ने आण शक्य असल्याने थांब्यावरील प्रवाशांचा खोळंबाही टळेल आणि नाँनस्टाँप पाँईंट टू पाँईंट प्रवास सुकर होईल. मार्गिकेवर  सतत एकापाठोपाठ पाँड कार धावणार असल्याने प्रवाशांना वाहनांच्या प्रतीक्षेत तिष्ठत उभे रहावे लागणार नाही.  सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची क्षमताही वाढवली जाईल असे एमएमआरडीएच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :काररस्ते वाहतूकमुंबईएमएमआरडीए