पश्चिम रेल्वे स्थानकावर सहा ठिकाणी बसविणार स्वयंचलित पर्जन्यमापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 02:01 AM2019-05-12T02:01:42+5:302019-05-12T02:01:52+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भार्इंदर स्थानकावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे किती वेळेत किती पाऊस पडला, यांची नोंद घेऊन रेल्वे नियोजन करणे शक्य होणार आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भार्इंदर स्थानकावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे किती वेळेत किती पाऊस पडला, यांची नोंद घेऊन रेल्वे नियोजन करणे शक्य होणार आहे.
पश्चिम रेल्वे आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या प्रयत्नांनी पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भार्इंदर स्थानकावर उभारण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार या भागात एकूण सहा ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. महालक्ष्मी, वांद्रे, राम मंदिर, दहिसर, मीरा रोड या ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसवून पावसाच्या नोंदी घेण्यात येणार आहे. या पाच स्थानकांवर ३१ मेपर्यंत स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविली जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील भार्इंदर स्थानकावर बसविण्यात आलेले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र पावसाची नोंद करणार आहे. किती पाऊस पडला, याची अचूक माहिती यातून मिळणार आहे. यामध्ये
कोणत्याही मानवी हस्ताक्षेपाशिवाय या यंत्रणेने काम केल्याने रेल्वेचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. ही यंत्रणा सौरऊर्जेवर चालविण्यात येत असून, आवश्यकतेनुसार विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासह बॅटरी बॅकअॅपची यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.
मान्सूनची तयारी...
पश्चिम रेल्वे मार्गावर मान्सूनची तयारी जोरदार सुरू आहे. मान्सूनपूर्व कामाचा पहिला टप्पा २५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, तर दुसरा टप्पा १ जून ते ३० सप्टेंबर असणार असून, यात पावसाळ्यातील महत्त्वाची उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे या स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्राचा वापर पश्चिम रेल्वेसाठी खूप उपयोगी पडणार आहे. लोकल सेवेचे वेळापत्रक, पावसाळ्यातील पाणी भरण्याच्या जागा, पंपाची व साफसफाईची व्यवस्था या सर्वांचे नियोजन करण्यास पश्चिम रेल्वेच्या आॅपरेटिंग विभागाला शक्य होणार असल्याचे मत पश्चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केले.