मुंबई: अलीकडेच बॉलिवूड क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. मात्र, यानंतर एका मुलाखतीत बोलताना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान केले. यावरून देशभरातून कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना कंगना रणौतला पाठिंबा देत ती योग्य असल्याचे म्हटले होते. यावर प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी, विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. ते विचार करूनच बोलले असतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत अवधूत गुप्ते यांना पत्रकारांकडून कंगना रणौत यांनी केलेले वक्तव्य आणि याला विक्रम गोखले यांनी दिलेले समर्थन यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना अवधूत गुप्ते यांनी सांगितले की, आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही, असे अवधूत गुप्ते यांनी सांगितले.
विक्रम गोखले विचार करूनच बोलले असतील
विक्रम गोखले मोठे कलाकार आहेत. ते केवळ कलाकार म्हणून मर्यादित नाही. विक्रमजी विचारवंत असून, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. ते आमच्या वडिलांच्या स्थानी आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. ते जे काही बोलले असतील, ते विचार करूनच बोलले असतील. त्यांनी व्यक्त केलेले मत पूर्ण विचारांती असावे. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी पात्रता नाही, असे अवधूत गुप्ते यांनी सांगितले. तसेच कंगनाच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देणे अवधूत गुप्ते यांनी टाळले.
असे लोक असतात समाजात
विक्रम गोखले यांनी केलेल्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी, असे मला वाटत नाही. असे लोक असतात समाजात, असे सांगत शरद पवार यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
काय म्हणाले होते विक्रम गोखले?
कंगनाला पाठिंबा देत विक्रम गोखले म्हणाले होते की, कंगना बोलली ते अगदी खर आहे. मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो. कोणाच्या मदतीने स्वातंत्र्य मिळालेले नाही. ते भिकेतच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते, तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवले नाही, हे चुकीचे आहे, अशी भूमिका मांडत हा देश कधीही हिरवा होणार नाही. हा देश भगवा राहिला पाहिजे. जे ७० वर्षात झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी चांगले काम करतायत, असे विक्रम गोखले यांनी म्हटले होते.
दरम्यान, देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा मला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचे काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडले जाते. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे सांगत आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते.