हास्य ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. हसण्याने आयुष्य वाढते असेही म्हणतात. हसण्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये दातांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. दातांच्या ह्या अनन्यसाधारण महत्त्वाला आणि दात येण्यापासून ते दात पडण्यापर्यंतच्या अनेक करामतींना आजच्या जागतिक हास्य दिनानिमित्त विनोदबद्ध करणारा खुसखुशीत लेख.
.........................................
सध्या लॉकडाऊन जीवनशैली ही नवीन संस्कृती उदयास आली आहे. जीभेचे चोचले पुरवणे हा या संस्कृती मधील समुदायाचा दैनंदिन कार्यक्रम आहे. या कार्यात ‘तोंड सांभाळून राहणे’ शक्य होत नाही. एखादा समकालीन मानव यथेच्छ खाऊन निद्रादेवीच्या पूजनात तल्लीन झालेला असतो. आणि अचानक एखाद्या दाढेने अपरात्री बंड करून आपल्या स्वतंत्र पक्षाची घोषणा केल्याशिवाय, आपल्या जबड्याच्या मतदारसंघात, ‘दाढ’ नावाचा महत्त्वाचा राजकीय पक्ष पाठिंबा देत होता याची जाणीव होत नाही. दाढेने बंड केले की, ती हिरड्यांच्या युतीतून बाहेर पडण्याचा एक धक्का देते आणि आपले जबड्यातले सरकार कोलमडते. मुळात हे जबड्यातले आमदार-खासदार, नगरसेवक आपले अन्न चावण्याचे कार्य निमूटपणे करत असतात त्यामुळे आपण गाफील असतो. बरे ही दाढ फक्त स्वतः बंड करून गप्प बसत नाही तर शेजारच्या दातांना आमिष दाखवून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते.
दाढ बंड करताना एवढी ठणकते की स्थानिक वृत्तपत्रापासून जागतिक प्रसारमाध्यमांपर्यंत म्हणजे-पायांच्या बोटाच्या नखापासून ते मेंदूपर्यंत सगळ्यांना नोंद घ्यावी लागते. ही बंडखोर दाढ तुमच्या झोपेवर अचानक हल्ला चढवते. तिच्या अंगाशी बांधलेल्या सगळ्या नलिकांना घायाळ करते.
लहान बाळाला दात येताना ताप येतो आणि दात येणार असे म्हणतात. येताना ताप देणारा हा दात पुढच्या आयुष्यभरात मऊ, टणक, कणखर, आंबट, तिखट, तुरट, पांचट असे सगळे ताप निमूटपणे सहन करतो. हे करत असताना तो किडतो, झिजतो पण कर्तव्य काही सोडत नाही.
दाताचा टोलनाका जेवढा भक्कम तेवढी अन्नाची वाहतूक सुरळीत. पण दात हा आपल्या खाण्याशी संबंधित असणारा असल्याने हा खूपच भाव खाणारा, ठळक दिसणारा ऐवज आहे. हा काहींना अत्यंत पराकोटीचे सौंदर्याचे दान देतो, तर काहींचे रूप एकदम विचित्र करून टाकतो. आवाजाची पट्टी योग्य ठेवण्यासाठी दाताच्या पेटीतल्या या पांढऱ्या पट्ट्या मोलाची भर टाकत असतात आणि आवाजाला आपल्या हवे तसे घासून पुसून जबड्याच्या बाहेर पाठवतात.
‘चावणे’ हा दातांचा मूळ स्वभाव आहे. म्हणून हे जन्माला आल्यापासून चावण्याचा हक्क निमूटपणे बजावत असतात. सुरुवातीला आईच्या बोटांना चावण्यापासून हा प्रवास सुरु होतो. नंतर भांडणात मित्र-मैत्रिणींना हा प्रसाद मिळतो आणि मोठेपणी स्वतःचीच जीभ नकळत चावण्यापर्यंत यांची मजल जाते. वैचारिक दृष्ट्या इतरांची डोकी खाणारी माणसं, सकाळी उठून काथ्या चावण्याचा एक तासाचा व्यायाम करतात अशी एक आख्यायिका आहे.
‘दात विचकायला याला काय झालं रे’ हे वाक्य कधी आले याचा शोध पण चालू आहे. लहान मुले दात विचकतात. खिदिखिदि, फिदिफिदि ही जपानी लोकांनी भारतीयांच्या हसण्यावर दिलेली विशेषणं असावीत. फिस्सकन आणि खुदकन हसण्याची विशेषणे अरबांनी दिलेली असावीत. ‘गडगडाट’ हे विशेषण मात्र पक्के मराठी मातीतले आहे. ‘सातमजली’ हसणे हे बांधकामाशी संबंधित आहे. दोन मजली भक्कम वाड्यावर उरलेले पाच मजले बांधण्यासाठी या हास्याचा उपयोग होत असावा.
हां तर मी काय सांगत होतो की, शरीरात दात हा एक किमती ऐवज आहे. त्यामुळे त्याचा दवाखाना सुद्धा किमती. शस्त्रास्त्रांनी नटलेला असतो. इथली आलिशान खुर्ची फारच आरामशीर असते. (या खुर्चीत दुपारची झोप घेण्याची माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आहे.) पण एकदा दातांचे बांधकाम, पाडकाम, गिलावा, ग्रील बसवणे, वेल्डिंग, फिटिंग, ग्रीलिंग सगळी झाली, की त्या खुर्चीची धास्ती बसायला लागते. काही जणांचे दात अंगणाबाहेर फिरायला जातात म्हणून त्यांना तारेचे कंपाउंड घालून ठेवतात आणि या तारा दर महिन्याला आवळून एका सुरात ठेवल्या जातात. इतर डॉक्टरांपेक्षा दातांच्या डॉक्टरांशी मैत्री जास्त लवकर होते. जबड्याचा आणि बोलण्याचा संबंध असल्याने दंतवैद्यांना गप्पा मारण्याचे वरदान लाभले असावे. दंतवैद्यांच्या खुर्चीत बसलं की वैमानिकासारखा किंवा चांद्रयानात बसल्याचा भास होतो. आपल्या आजूबाजूला सरकणारी, हलणारी, वर खाली होणारी यंत्र असतात. दात तपासण्याची एक एक शस्त्र, अस्त्रांसारखी जबड्यात प्रवेश करतात. त्याने आपण ब्रम्हांडात असल्याचा भास होतो. पण बिल पाहिल्यानंतर आपण पुन्हा जमिनीवर येतो. पाकीट जड असेल तर दुःख हलके होते. ‘ट्रिटमेंट’ या शब्दात ‘अर्थ’ दडलेला आहे.
‘दातांची काळजी घे’ असे बालपणी दातांच्या कण्या करून आई सांगत असते, पण दुर्लक्ष झाले की दातांसकट पाठीचा कणा मोडण्याची वेळ येते. ‘आइसक्रीम आणि चॉकलेट हे जिभेचे मित्र आणि दातांचे शत्रू आहेत.’ असाच विचार एका दंतवैद्यांच्या दर्शनी भागात लिहून ठेवलेला मी पाहिलाय.
वय वाढत जाते दातांचा किल्ला भुईसपाट होतो आणि दुधाच्या दातापासून सुरू झालेला हा प्रवास कवळीच्या दारात येऊन थांबतो. म्हातारपण आणि कवळी हे विरुद्ध टोकाचे शब्द जवळ येतात आणि भाडेतत्त्वावर दातांची खरेदी करून-बांधा, वापरा, जपून ठेवा या तालावर नवा प्रवास सुरू होतो.
दातात एक कळ आली तर एवढे आठवले. कंटाळवाणे होण्याआधी हे दंतपुराण थांबवतो.
- प्रा. दीपक देशपांडे
(लेखक हास्य कलाकार आहेत.)