Join us

युनिक आयडीसोबत लवकरच ऑनलाइन कळतील उपलब्ध खाटा; पालिका आयुक्तांनी दिली केंद्राला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 2:00 AM

मुंबईत राबविणार यंत्रणा

मुंबई : मुंबईतील खासगी आणि महापालिका रुग्णालयांत आवश्यक समन्वय तसेच सहकार्य स्थापन केले जात आहेत. याद्वारेआयसीयू, ऑक्सिजन खाटा यांसारख्या आरोग्य सुविधा रुग्णांसाठी आवश्यकतेनुसार कशा उपलब्ध करून दिल्या जातील याकडे गांभीर्यानेलक्ष देण्यात येत असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांना दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यांनी, मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील एकूण रुग्णसंख्येपैकी ७० टक्के रुग्णसंख्या असणाऱ्या राज्यांच्या महापालिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधला. दरम्यान यामध्ये रुग्णसंख्येचा आलेख, मृत्यूदर, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा प्रमाण तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण यासंदर्भात महापालिकांकडून सादरीकरण करण्यात आले.

मुंबईची माहिती देताना पालिका आयुक्तांनी आपण लवकरच रुग्णालयांत उपलब्ध खाटांची संख्या युनिक आयडीसोबत वेब पोर्टलवर ऑनलाइन दिसेल अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. सोबतच जीपीएस यंत्रणेने सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स ट्रॅकिंग प्रणालीही तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान सांगितले.

या संवादादरम्यान हाय रिस्क आणि घनदाट वस्तीमधील गर्दीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले. मृत्युदर कमी करण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. काही महापालिकांमध्ये कोरोनाबाधित शोधून काढण्यासाठी टेस्टिंगची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्याचसोबत पुढील २ महिने तरी आयसीयू खाटा, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्स खाटांची व्यवस्था यावरही लक्ष केंद्रित करायला हवे.

शासन आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये समन्वय साधून सॅम्पल कलेक्शन अधिकाधिक लवकर करण्यावर भर द्यायला हवा. कोरोनाबाधितांचे पॉझिटिव्ह आढळून आलेले परिसर, त्यांचे निर्जंतुकीकरण, स्थलांतरितांसाठी तयार करण्यात आलेल्या कॅम्पसचे व्यवस्थापन, तेथील स्थानिक भाषेतून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत, परिचारिकांकडून करण्यात येणारी जनजागृती, यामध्ये एनजीओ, युवा वर्ग यांचा अपेक्षित सहभाग या सर्वांवरही लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

रुग्णवाहिका ट्रॅकिंग प्रणाली

कोरोनाचा मुंबईतील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून लवकरच जीपीएस यंत्रणेने सुसज्ज रुग्णावाहिका ट्रॅकिंग प्रणालीही तयार करण्यात येईल, असे मुंबई पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका