तारिणी गिध यांचा छंद; आंतरराष्ट्रीय पेपर फ्लॉवर दिन विशेष
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - अठराव्या शतकातील वनस्पती कलाकार मेरी डेलानी यांच्या जन्मदिन १४ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय पेपर फ्लॉवर दिन म्हणून साजरा केला जातो.
हुबेहूब कागदी फुलांची निर्मिती करणे ही एक कला आहे. ती कला लहानपणापासून जोपासली आहे ती तारिणी केदार गिध यांनी. इकोफ्रेंडली हँडीक्राफ्ट्स बनवण्यातही त्या माहिर आहेत. विशेष म्हणजे कागदापासून फुलांची निर्मिती करण्यासाठी त्यांनी जेट ऐअरवेजमधील नोकरीही सोडली. कागदापासून फुलांची निर्मिती करणारी छंदिष्टी म्हणून त्यांची ओळख आहे.
सध्याच्या गंभीर परिस्थितीत व लॉकडाऊनच्या काळात असा एखादा छंद जाेपासणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे माणसाचे विचलित झालेले मन थाऱ्यावर येते. मनाला आनंद मिळतो, वेळ चांगला जातो, डोक्याला चालना मिळते आणि आपण आपल्या जीवनात काहीतरी चांगले करून दाखवू शकताे, हे तारिणी गिध यांनी कागदी फुलांच्या निर्मितीतून सिद्ध केले आहे.
त्यांनी ‘लाेकमत’ला सांगितले की, कागदी फुले बनवण्याची आवड मला शाळेपासूनच होती. कारण माझी आई (श्रद्धा खेडेकर) जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची आर्ट मास्टर असल्यामुळे विविध प्रकारची फुले ऑरगंडी कापडापासून बनवायची व ऑइल पेंटिंग करायची. कागदी फुले बनवणे तसे कठीणच आहे, कारण त्यासाठी वेळ, संयम व चिकाटी गरजेची आहे. एखादे फूल मग ते कोणतेही असो, ते खरे कसे वाटू शकेल याचाच विचार मी करू लागले आणि मनाला समाधान वाटेपर्यंत प्रयत्न करत राहिले आणि अजूनही करते. माझी कला बघून माझ्या काकीने (शुभांगी खेडेकर) मला तिच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली (बोंद्रे काकी) ज्या सुंदर कागदी फुले बनवायच्या. मी त्यांच्याकडून पाच ते सहा प्रकारची फुले शिकून घेतली आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या कागदी फुलांच्या निर्मितीची वाटचाल सुरू झाली.
कागदी फुले बनवण्यासाठी दुपलेक्स क्रेप पेपरचा वापर करते. गुलाब, जास्वंद, सोनचाफा, झेंडू, कमळ, कारनेशन, जरबेरा, लिली, कॅला लिली, अंथुरियम, क्रोकस, गार्डन कॉसमॉस, बोगेनविला, डेलिया, मॅग्नोलिया, इखनेशिया सुप्रीम कॉर्नफ्लॉवर, बर्ड ऑफ पॅराडाईज, ऑरेंज ब्लॉसम, आयरिस, एंजल्स ट्रंपेट, पियोनी, पॉप्पी अशा अनेक प्रकारची अनेक देशी-विदेशी फुले कागदापासून तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
मी वाढदिवस, लग्न समारंभांना, लग्नाच्या वाढदिवसाला तयार केलेली फुले भेट म्हणून देऊ लागली. लोकांनी माझ्या कलेचे काैतुक केल्याने मला प्रोत्साहन मिळाले. ही कला बघून मग काहींनी शिकून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मग मी पेपर फ्लाॅवर मेकिंगची शिबिरे घेण्यास सुरुवात केली. माझा छंद व्यवसायात कसा बदलत गेला, हे माझे मलाच समजले नाही. लोकांना माझ्या कागदी फुलांची माहिती होऊ लागली तशी मला गणपतीची आरास, दिवाळी, नाताळ, लग्नात रुखवत, प्रॉडक्ट ब्रॅण्डिंगसाठी कागदी फुले, व्हॅलेन्टाइन्स डे अशा अनेक कारणांसाठी ऑर्डर मिळू लागली, असे त्या म्हणाल्या.
माझी ही चिकाटी, मेहनत आणि आवड बघून माझ्या मिस्टरांनी (केदार गिध) मला जर्मनीतून अप्रतिम कॉलिटी आणि रंगांचे क्रेप पेपर्स खास मागवून भेट म्हणून दिले. त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माझे आई-वडील आणि सासू, सासरे या सर्वांनी मला माझी कला जोपासायला खूप साथ दिली आणि अजूनही देतात. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे अशक्यच आहे, असे त्या म्हणाल्या. कागदापासून फुले तयार करण्याची कला त्या लोकांपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून Starini Creation या क्रिएटिव्ह पेजच्या माध्यमातून पाेहाेचवतात.
............................................