एक लाख पक्षी छायाचित्रे संग्रही असलेला अवलिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:12 AM2018-03-21T01:12:48+5:302018-03-21T01:12:48+5:30
पेशाने वास्तुविशारद असलेल्या नीरज चावला यांनी १२ वर्षांत दुर्मीळ जातीच्या पक्ष्यांच्या तब्बल ६० प्रजातींची छायाचित्रे टिपली आहेत. चारकोप येथील रहिवासी असलेल्या चावला यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक पक्ष्यांची छायाचित्रे काढली आहेत.
मुंबई : पेशाने वास्तुविशारद असलेल्या नीरज चावला यांनी १२ वर्षांत दुर्मीळ जातीच्या पक्ष्यांच्या तब्बल ६० प्रजातींची छायाचित्रे टिपली आहेत. चारकोप येथील रहिवासी असलेल्या चावला यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक पक्ष्यांची छायाचित्रे काढली आहेत. प्रत्येक छायाचित्रात पक्ष्यांचे हावभाव, जीवन, पक्ष्यांची अंडी, नवजात पिल्लू, भक्षक पकडताना; अशा वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्रे त्यांच्या संग्रही आहेत. खंड्या, चातक, दयाळ, वंचक, सुगरण, घुबड, कोकीळ, हळद्या, पावशा, बुलबुल यांसारख्या अनेक पक्ष्यांची छायाचित्रे त्यांनी काढली आहेत.
पक्ष्यांमधील नर आणि मादीच्या रंग फरकाचा अभ्यास करून ते अचूक छायाचित्र टिपतात. चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशातून त्यांनी यापैकी बरीच छायाचित्रे काढली आहेत. शिवडी येथील फ्लेमिंगो, कोकणातून येऊरला येणारा किंगफिशर पक्षी, संजय गांधी उद्यानात असलेली रस्टी स्पॉटेड कॅट तसेच वाघांच्या वेगवेगळ्या मुद्रा, कांदिवली परिसरात कडाडणारी वीज; अशी छायाचित्रेही त्यांच्या संग्रही आहेत.
...तर मानवही नामशेष होईल!
पक्षी ही निसर्गाची अनोखी देणगी आहे. निसर्गातील प्रत्येक घडामोडीची माहिती सर्वांतआधी पशुपक्ष्यांना होते. नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर पक्ष्यांचा घोळका वेगवेगळ्या आवाजांत ओरडण्यास सुरुवात करतो. जंगलतोड, वाढती लोकसंख्या, सिंमेटची जंगले यामुळे पक्ष्यांची घरटी नष्ट झाली आहेत. निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे. अन्नसाखळी विस्कळीत झाल्यामुळे पक्षी स्थलांतरित होत आहेत. निसर्गातून पशू-पक्षी नामशेष होत आहेत. यावर त्वरित उपाययोजना न आखल्यास पुढचा ‘नंबर’ मानवाचा यायला वेळ लागणार नाही.
- नीरज चावला, पक्षी छायाचित्रकार