देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत सरासरी १९ टक्के वाढ झाल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:44 AM2018-12-22T06:44:36+5:302018-12-22T06:44:52+5:30

देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत १९.२१ टक्के वाढ झाली आहे.

 The average domestic air traffic has increased by 19 percent | देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत सरासरी १९ टक्के वाढ झाल्याचे उघड

देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत सरासरी १९ टक्के वाढ झाल्याचे उघड

Next

- खलील गिरकर
मुंबई : देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत १९.२१ टक्के वाढ झाली आहे. हवाई प्रवासावेळी विविध सुविधा न मिळाल्याबाबत ७८६ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ७०० तक्रारी सोडवण्यात आल्या असून ८६ तक्रारी प्रलंबित आहेत.
१२ कोटी ६२ लाख ८३ हजार प्रवाशांनी या कालावधीत देशांतर्गत प्रवास केला आहे. २०१७ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत १० कोटी ५९ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने अहवालामध्ये ही माहिती दिली आहे. नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी संख्येत किंचित घट होऊन ही संख्या ७८.६ टक्के झाले. आॅक्टोबर महिन्यात ही संख्या ७८.८ टक्के होती. इतर सर्व खासगी विमान सेवांच्या भारमानात किरकोळ वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील एकूण प्रवाशांपैकी एअर इंडियाचा हिस्सा १२.२ टक्के आहे तर खासगी विमान वाहतूक कंपन्यांचा हिस्सा ८७.८ टक्के आहे. एअर इंडियाद्वारे १४ लाख १८ हजार प्रवाशांनी तर खासगी विमान कंपन्यांद्वारे १ कोटी २ लाख २७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एअर इंडियातर्फे १ कोटी ६० लाख ४४ हजार, तर खासगी कंपन्यांद्वारे ११ कोटी २ लाख ३९ हजार प्रवाशांनी प्रवास केला. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाचे भारमान सर्वात जास्त फेब्रुवारी महिन्यात ८६.७ टक्के होते तर नोव्हेंबरमध्ये यंदाचे सर्वात कमी ७८.६ टक्के भारमान नोंदवण्यात आले.

प्रवाशांच्या ७०० तक्रारींचे निरसन; सोईसुविधांबाबत नाराजी

हवाई वाहतुकीबाबत प्रवाशांनी ७८६ तक्रारी केल्या. त्यापैकी ७०० तक्रारींचे निराकरण करण्यात आले, तर ८६ प्रलंबित आहेत. प्रलंबित तक्रारींमध्ये विस्ताराच्या सेवेबाबतची एक तक्रार आहे तर उर्वरित ८५ तक्रारी केवळ एअर इंडियाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत आहेत. ७८६ तक्रारींपैकी सर्वाधिक २४७ तक्रारी एअर इंडियाच्या सेवेबाबत, जेट एअरवेजबाबत २४० तर इंडिगोबाबत २३३ तक्रारी आहेत. एअर एशियाबाबत १४, विस्ताराबाबत ७, गो एअरसंदर्भात २३, स्पाइस जेट २० तर ट्रु जेटसंदर्भात २ तक्रारी आहेत.

Web Title:  The average domestic air traffic has increased by 19 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान