मुंबई : मुंबईत अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जात असून, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मीटर रीडिंगशिवाय पाठविण्यात आलेल्या सरासरी वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले. अनेक ग्राहकांनी बिल भरले नाही. त्यामुळे वीज कंपन्यांनी नोटीस बजावली. कालांतराने वीज ग्राहकांनी बिले भरण्यास सुरुवात केली. आता लॉकडाऊन शिथिल होत असतानाच जून महिन्यापासून नियमितपणे मीटर रीडिंग सुरू झाले असून, ग्राहकांना बिल नियमित मिळत आहे. महावितरणच्या भांडुप झोनकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात मीटर रीडिंग झाले नव्हते. त्यास कारणेही तशीच होती. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जून महिन्यानंतर मीटरचे रीडिंग नियमित होते आहे. एखाद्या ठिकाणावरून मीटर रिडिंग होत नसल्याची तक्रार दाखल झाली तर तिची दखल घेतली जाते. याव्यतिरिक्त वीज ग्राहक स्वत: अॅपवरून मीटर रीडिंगचा फोटो काढून पाठवितात. साेबतच महावितरणचे कर्मचारी अथवा नेमणूक केलेल्या एजन्सीद्वारे नियमितपणे मीटर रीडिंग घेतले जाते.टाटा पॉवरकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे मीटरचे रीडिंग सुरू आहे. यासंदर्भात तक्रार आल्यास त्याची दखल घेतली जाते. मुळात बेस्ट, अदानी आणि महावितरणच्या तुलनेत टाटा पॉवरचे वीज ग्राहक संख्येने कमी आहेत.अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, २० जूनपासून मीटरचे रीडिंग पुन्हा सुरू झाले आहे. आता बिले वास्तविक मीटर रीडिंगच्या आधारे दिली जात आहेत. शिवाय ग्राहकांना त्यांच्या मीटरचे रीडिंग स्वत: अॅपच्या माध्यमातून नोंदविता येईल. व्हॉट्सॲप, चॅटबॉट, वेबसाइट आणि मोबाइल ॲपसारख्या अनेक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्याने मीटर रीडिंग न घेतल्यास तसे ग्राहकाला सूचित केले जाईल आणि पुढील रीडिंगची तारीखही कळविली जाईल. बिलाच्या रकमेसंदर्भात शंका असल्यास मीटरची तपासणी करण्यासाठी आवश्यक साहाय्य केले जाते.
टाटा पॉवर काय म्हणते?- ७ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी बिलांचा भरणा करण्यासाठी व्याजमुक्त हफ्ता योजनेचा लाभ घेतला.- एसएमएसअंतर्गत महिन्याला २.५ लाखांहून ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचली.- एप्रिल ते जुलै या कालावधीत ३१ हजारांहून जास्त ग्राहकांना टेलि कॉलिंग सेवा पुरविण्यात आली.- एप्रिल ते जुलै या कालावधीत ग्राहकांच्या घरून १४ हजारहून चेक पेमेंट्स मिळाली.- डिजिटल सुविधांची माहिती १ हजारापेक्षा जास्त ग्राहकांना मेलवर गेली.- पैसे गोळा करण्यासाठी कमर्शियल ऑफिसर्सचा वापर करून २१ हजार ग्राहकांशी संपर्क साधला.
महावितरण काय म्हणते?- सोसायटीमध्ये वीज ग्राहकांसाठी मदत कक्ष स्थापन केला.- व्हाॅट्सॲप ग्रुप बनवून ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधला.- मोबाइलच्या माध्यमातूनही वीज बिलाबाबत माहिती देण्यात येत आहे.
अदानी काय म्हणते?- ५.५ लाख ग्राहकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर केला.- ३.७ लाख ग्राहकांनी वेबसाइटद्वारे संपर्क साधला.- १.५ लाख ग्राहकांनी चॅटबॉट इलेक्ट्रा सेवेचा वापर केला.- २८ हजार १९६ ग्राहकांनी ट्विटरद्वारे संपर्क साधला.- १९३३ जणांनी फेसबुकद्वारे सेवा प्राप्त केल्या.- १.१ लाख ग्राहकांनी व्हॉट्सॲप सेवेचा वापर केला.
काेरोना काळात वीज कंपन्यांनी सरासरी काढून अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवली. साहजिकच ती भरता आली नाहीत. नंतर वीज कंपन्यांनी नोटीस बजावली. परिणामी, बिले भरावी लागली. तेव्हा मीटर रीडिंग झाले नव्हते. मात्र आता रीडिंग होत आहे. - विनोद घोलप, मालाड
कोरोना काळात मीटर रीडिंग झाले नव्हते. या काळात सरासरी वीज बिले आली होती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून रीडिंग होते आहे. त्यामुळे नियमित बिल येत आहे.- परेश चव्हाण, गोरेगाव