मुंबई : राज्यातील नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत एसटीची सेवा २२ मेपासून सुरू झाली आहे. निवडक मार्गांवर या फेºया होत आहेत. सध्याच्या नियमाप्रमाणे प्रत्येक फेरीमध्ये २२ प्रवाशांची आसन क्षमता असताना प्रत्यक्षात सरासरी फक्त ७ प्रवासीच प्रवास करीतअसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक एसटी डेपोमध्ये उत्पन्नापेक्षा डिझेल आणि नियोजनाचा खर्च अधिक होत आहे. लॉकडाउनच्या आधी दररोज २२ कोटींचे उत्पन्न मिळविणाºया एसटी महामंडळाला सध्या केवळ ४ ते ६ लाखांच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागत आहे.
कोरोनामुळे प्रवाशांची पाठ
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये रिकाम्या बस फिरत आहेत. तर, काही बस चार ते पाच प्रवाशांना घेऊन धावत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचा संचित तोटा सहा हजार कोटींपेक्षा जास्त वाढला आहे.मुंबई, पालघर, ठाणे येथील अत्यावश्यक सेवा वगळता राज्यभरातील एसटी सेवा दोन महिने बंद होती. त्यानंतर एसटीची जिल्ह्यांतर्गत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२२ मे या पहिल्याच दिवशी ४५७ गाड्यांचा वापर करीत निवडक मार्गांवर २ हजार ७ फेºया झाल्या. यातून ११,१५१ प्रवाशांनी प्रवास केला.तेव्हापासून २६ मेपर्यंत निवडक मार्गांवर ३,११८ बस चालविण्यात आल्या. यामध्ये १४,२८२ फेऱ्यांद्वारे ९३,३९३ प्रवाशांनी प्रवास केला. २२ ते २६ मे या कालावधीत एसटी महामंडळाला अंदाजे २२ ते २५ लाखांचे उत्पन्न मिळाले.