Join us

प्रवाशांचा व्हिडिओ पाहून संतापले उड्डाण मंत्री; तातडीची बैठक अन् कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 1:26 PM

मुंबई विमानतळावरील डांबरी रस्त्यावर प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मुंबई - एअर इंडियानंतर सर्वाधिक वेळा ढिसाळ कारभाराच्या तक्रारी येत असलेली विमानसेवा गो इंडिगोची ठरू लागली आहे. क्रू मेंबर १० मिनिटांत येईल म्हणून प्रवाशांना दी़ड तास विमानातच बसवून ठेवणाऱ्या इंडिगोवर प्रवाशांचा रोष ओढवू लागला आहे. सोमवारी दाट धुक्यामुळे तासंतास बसवून ठेवणाऱ्या इंडिगोच्या वैमानिकावर एका प्रवाशाने संताप व्यक्त केला होता. आता, मुंबईविमानतळावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओची दखल थेट केद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी घेत संबंधित विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरील डांबरी रस्त्यावर प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओची दखल थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली. शिंदेंनी मध्यरात्रीच मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर, आज १६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास विमान वाहतूक मंत्रालयाच्या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने (BCAS) इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.  वाहतूक मंत्रालयाने या दोन्ही नोटिसांद्वारे इंडिगो आणि मुंबई विमानतळाला २४ तासांत उत्तरे मागितले आहे. तसेच, वेळेत उत्तर न दिल्यास आर्थिक दंडासह कडक कारवाई सुरू केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी तात्काळ याची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले. 

नेमकं काय घडलं?

१४ जानेवारी रोजी गोव्याहून दिल्लीला जाणारे विमान मुंबईला वळविण्यात आले होते. यामुळे प्रवाशांचा संयम संपला आणि त्यांनी विमानतळाच्या टरमॅकवरच बसकन मारली. तिथेच त्यांना जेवण, पाणी आदी देण्यात आले. याचा व्हिडीओ व्हायरल होताच इंडिगोने माफी मागितली आहे. तसेच असे प्रकार भविष्यात न होण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील असे म्हटले आहे. 

व्हिडिओत काय दिसते?

धावपट्टीवर बसलेल्या प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रवाशांनी दावा केला की, १४ जानेवारी रोजी दिल्ली इंडिगो फ्लाइटला सुमारे १८ तास उशीर झाला आणि त्यानंतर ते विमान मुंबईकडे वळवण्यात आले. उशीर झाल्यामुळे निराश होऊन, फ्लाइट 6e2195 च्या प्रवाशांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि इंडिगो विमानाच्या शेजारीच बसून जेवण केले. दरम्यान, या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानेही आपले निवेदन जारी करून पुढील कारवाई होईपर्यंत प्रवाशांना एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांच्या कडक निगराणीखाली आणि सुरक्षेखाली ठेवण्यात आले होते, असे म्हटले आहे.  

टॅग्स :मुंबईविमानतळप्रवासीज्योतिरादित्य शिंदे