Join us

अविनाश भोसले पुन्हा सीबीआयच्या नजरकैदेत; येस बॅंकप्रकरणी आज हाेणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 6:13 AM

सीबीआयने अविनाश भोसले यांना २६ मे रोजी पुण्यातून अटक केली होती.

मुंबई :  येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीएल ग्रुपचे अध्यक्ष अविनाश भोसले यांच्या सीबीआय कोठडीबाबत दोन्ही पक्षांमध्ये युक्तिवाद झाला. मात्र, दिवसभराचे कामकाज पूर्ण होत असल्याने न्यायालयाने आपला निकाल मंगळवारपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे भोसलेंना पुन्हा एकदा नजरकैदेत पाठवण्यात आले. दरम्यान, पुढील सुनावणी मंगळवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. 

सीबीआयने अविनाश भोसले यांना २६ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना २७  मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयने  भोसलेंची १० दिवसांकरिता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला पुन्हा कडाडून विरोध केला. त्यामुळे त्यांचा निकाल राखून ठेवत भोसले यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. तसेच सोमवारी त्यांची सुनावणी ठेवण्यात आली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर भोसले यांच्यावतीने वकील विजय अग्रवाल यांनी पुन्हा कोठडीला विरोध केला.  

सीबीआयतर्फे युक्तिवाद करत वकील अनिल सिंग यांनी आरोपीच्या वकिलांनी सीबीआय कोठडी न देण्याबाबतचा केलेला अर्ज रद्द करण्याची मागणी केली. तसेच, २८ एप्रिलला याच प्रकरणात  संजय छाब्रियाला अटक करून  सीबीआय कोठडी घेतली होती. पुढे त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्याच प्रकरणामध्ये  अविनाश भोसले  हा  आरोपी आहे. आरोपी तपासाला सहकार्य करत असला, तरी चौकशी करणे गरजेचे आहे. 

याप्रकरणाची व्याप्ती मोठी असून, मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाल्याचा दावा केला आहे. तसेच,  आरोपीच्या वकिलाकडून होणारा दडपशाहीचा आरोपदेखील चुकीचा असल्याबाबत त्यांनी नमूद केले आहे. त्यापाठोपाठ, सीबीआयतर्फे दुसरे वकील जितेंद्र शर्मा यांनी युक्तिवाद करताना या प्रकरणात आलेले पैसे कुठे-कुठे गेले, याची चौकशी आम्हाला करायची आहे. एका प्रकरणाची ईडीने चौकशी केलीं तर सीबीआय चौकशी का करू शकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  

दिलासा की काेठडी?वेळेअभावी दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर, अविनाश भोसले यांचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात होणार असून, भोसले यांना दिलासा मिळतो की, त्यांची रवानगी सीबीआय कोठडीत होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :न्यायालयगुन्हा अन्वेषण विभाग