Join us

अविनाश भोसले सीबीआयच्या नजरकैदेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 8:35 AM

उत्तरासाठी न्यायालयाने सीबीआयला ३० मेपर्यंत मुदत दिली असून, तोपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सीबीआयला दिले.

मुंबई : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तीन हजार कोटींच्या घोटाळ्यात केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीएल ग्रुपचे अविनाश भोसले यांनी केला. त्यासंदर्भात त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्जही दाखल केला. यावर उत्तरासाठी न्यायालयाने सीबीआयला ३० मेपर्यंत मुदत दिली असून, तोपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सीबीआयला दिले. 

रेडियस ग्रुपने सुमेर ग्रुपसोबत भागीदारीत असलेल्या एका निवासी प्रकल्पासाठी डीएचएफएलकडून तब्बल ३ हजार ९४ कोटींचे कर्ज घेतले जे थकीत आहे. सीबीआयने एप्रिलमध्ये रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केली. नंतर अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याकडे मोर्चा वळवत मुंबई आणि पुण्यात छापेमारी केली होती. गेले काही दिवस भोसले यांचा शोध सुरु होता. भोसले पुण्यात असल्याची कळताच सीबीआयच्या पथकाने त्यांना अटक केली. भोसलेंना ३० मे रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश सीबीआयला दिले. तोपर्यंत सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात सीबीआयच्या नजरकैदेत ठेवले जाईल. या काळात सायंकाळी ५ ते ६ दरम्यान भोसलेंना वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

टॅग्स :पुणेगुन्हा अन्वेषण विभाग