Join us

अविनाश भोसलेंची लंडनमध्ये १ हजार कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 4:09 PM

डीएचएफएल आणि रेडियस ग्रुपकडून मिळालेल्या कर्जाचा वापर करून भोसले यांनी लंडनमध्ये घर विकत घेतले.

मुंबई : देशातील सर्वांत मोठा बँक घोटाळा म्हणून गाजत असलेल्या डीएचएफएल घोटाळ्यात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी लंडन येथे जवळपास १ हजार कोटी रुपयांचे घर विकत घेतले होते. यासाठी येस बँकेकडून ७०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रातून समोर आले आहे. सध्या या प्रकरणात भोसले, कपूर, रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया आणि डीएचएफएलचे प्रमोटर वाधवान हे आरोपी आहेत.

डीएचएफएल आणि रेडियस ग्रुपकडून मिळालेल्या कर्जाचा वापर करून भोसले यांनी लंडनमध्ये घर विकत घेतले. छाब्रिया भोसले यांना त्यांच्या गुंतवणुकीवर १८ टक्के व्याज देत होते. ३०० कोटी रुपये अविनाश भोसले यांनी फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विकत घेण्यासाठी वापरले. या संपत्तीची तेव्हाची किंमत ९२.५ मिलियन जीबीपी (ब्रिटिश चलन) इतकी होती. त्यांनी ही संपत्ती ब्रिटनमधील नोंदणीकृत कंपनी असणाऱ्या फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडच्या माध्यमातून विकत घेतली. येस बँकेने डीएचएफला ४,७२७ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता देत नंतर ते डिफॉल्ट म्हणून दाखविले. यात येस बँकेला मोठा तोटा झाला तर डीएचएफएलला फायदा मिळवून देण्यात आला, असे सीबीआयने म्हटले आहे.

बँकेकडून मिळाले कमिशनया व्यवहारासाठी ७०० कोटी रुपयांचे कर्ज येस बँकेकडून घेण्यात आले होते. कर्जाची रक्कम थेट ब्रिटन येथील भोसले यांच्या खात्यात पाठविण्यात आली, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. कर्जासाठी येस बँकेकडून भोसले यांना कमिशनही देण्यात आले होते. यासाठी कपूर आणि कपील वाधवान यांच्यात परस्पर सहमती झाली होती. येस बँकेने डीएचएफएलकडून वसूल केल्या जाणाऱ्या शुल्कात सूट देऊन भार उचलला, असलेल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात समोर आले आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीलंडन