गुरु नानक महाविद्यालयात पार पडले "अविष्कार"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 01:58 PM2022-12-24T13:58:20+5:302022-12-24T13:58:33+5:30
एकूण 300 हून अनेक महाविद्यालयातील 500 च्या वर विद्यार्थ्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेत भाग घेतला.
मुंबई - विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय, संशोधन पद्धती कशा असतात, नव-नवीन संशोधन कसे करता येऊ शकते यांसारख्या गोष्टी शिकायला मिळाव्यात तसंच त्यांच्यात संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली "अविष्कार" संशोधन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाच्या 17 व्या अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी सायन येथील गुरु नानक महाविद्यालयचे केंद्र देखील ठेवण्यात आले होते.
युजी, पीजी, पीपीजी अशा वर्गीकरणात त्यांचे भाग केले असून चार कॅटेगरी देखील त्यावेळी होत्या. एकूण 300 हून अनेक महाविद्यालयातील 500 च्या वर विद्यार्थ्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेत भाग घेतला. त्यात विद्यार्थ्यांनी त्यांचे संशोधन वेगवेगळ्या कॅटेगरी मधील परीक्षकांसमोर मांडले. प्रथम पोस्टर प्रेझेंटेशन आणि त्यातून निवड झालेल्यांचे पी पी टी प्रेझेंटेशन झाले.
"यंदाचा अविष्कार हा आमच्या महाविद्यालयात होतं आहे ही बाब समजल्यावर खूप आनंद झाला आणि अभिमान देखील वाटला. या निमित्ताने विद्यार्थ्यांची संशोधन करण्यासाठी असणारी धडपड प्रत्यक्षात बघायला मिळाली. अशा स्पर्धा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवतात" अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या प्राचार्या.डॉ.पुष्पिंदर भाटिया यांनी दिली.