अवनीचे बछडे उपाशी असून त्यांचा लवकर शोध घेण्याची गरज- प्रीती मेनन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:12 PM2018-11-10T17:12:20+5:302018-11-10T17:12:35+5:30
अवनी या वाघिणीच्या मृत्यूवरून आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
मुंबई - अवनी या वाघिणीच्या मृत्यूवरून आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशमधील एका रेस्क्यू टीमची माहिती तेथील वनाधिकाऱ्यांना दिली होती. स्थानिक सरपंचांनी वाघिणीला पकडण्याची मागणी केली होती, मारायची परवानगी मागितली नव्हती, असंही प्रीती मेनन शर्मा म्हणाल्या आहेत.
रात्री शिकार करण्यासाठीच संबंधित टीम तिथे गेली होती. डार्टही नंतर लावल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. ५०० हेक्टर जमीन ४० कोटींना रिलायन्सला देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले होते. त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. सिमेंट प्लांटसाठी जंगल संपवण्याचे काम नितीन गडकरी करत आहेत. त्यात सुधीर मुनगंटीवार मदत करत आहेत.
पेस्टसाईडमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू येथे झाला आहे. मात्र त्यावेळी मंत्र्यांना शेतकरी दिसले नाही. स्टेट वाइल्ड लाईफ बोर्डचे अनिश अंधेरीया यांच्या ट्रस्टने 2015 साली या ठिकाणी कॅमेरे लावले होते. त्यावेळी हल्ले झाले नव्हते. त्यानंतर हल्ल्यास सुरुवात झाली. त्याअर्थी अंधेरिया कॉर्पोरेट्सला मदत करत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.
म्हणूनच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आपने केली आहे, त्यात वेटनरी डॉक्टरचा समावेश असावा. मुनगंटीवार यांनी नेमलेली समितीत कनिष्ठांचा समावेश आहे. त्यामुळे हा दिखावा आहे. अवनीचे बछडे उपाशी असून त्यांचा लवकर शोध घेण्याची गरज आहे. त्यासाठी मध्य प्रदेशवरून तज्ज्ञांना बोलवावे. नाही तर उपाशी राहिल्याने किडनी खराब होऊन बछड्यांचा मृत्यू होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या आहेत.