स्वच्छता पाळा, आजारांना टाळा
By Admin | Published: May 22, 2017 02:30 AM2017-05-22T02:30:16+5:302017-05-22T02:30:16+5:30
पावसाळा सुरू झाल्यावर पाणी साचल्यामुळे डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळा सुरू होण्याआधीच डासांच्या उत्पत्तीची स्थान मोठ्या प्रमाणात आढळून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर पाणी साचल्यामुळे डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळा सुरू होण्याआधीच डासांच्या उत्पत्तीची स्थान मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने यंदा रोगराई वाढण्याचा धोका अधिक आहे, पण स्वच्छता ठेवल्यास पावसाळ््यात आजारपणाला टाळता येऊ शकते. पावसाळ््यात होणाऱ्या आजारांना टाळण्यासाठी इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनने (आयपीसीए) मुंबईत ‘पेस्ट क्लीन इंडिया’ हा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी अंधेरीच्या मीनाताई ठाकरे उद्यानात या उपक्रमाची सुरुवात झाली.
गेल्या काही वर्षांत मुंबईत डेंग्यू डोके वर काढत आहे. मलेरियाचे प्रमाण कमी झाले असले, तरीही रुग्ण आढळून येतात. डासांपासून होणाऱ्या आजारांना सहज रोखता येऊ शकते, पण याविषयी लोकांना आस्था कमी असल्याने पावसाळ््यात आजार बळावतात. या गोष्टी लक्षात घेऊन पावसाळ्याआधीच लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयपीसीएने हा उपक्रम हाती घेतल्याचे आयपीसीएचे अध्यक्ष राजू परुळकर यांनी सांगितले. मीनाताई ठाकरे उद्यानात स्थानिकांना एकत्र करून पे्रझेंटेशनच्या माध्यमातून डेंग्यू, मलेरिया या आजारांविषयी माहिती दिली. डासांची उत्पत्ती ही घरातील झाडांखाली ठेवलेल्या ताटल्या, फ्रीजचा ट्रे, एसीचा डक, फेंगशुई प्लँट, फुलदाणी अशा ठिकाणी साचून राहणाऱ्या पाण्यात होते, तर घराबाहेर ठेवलेल्या अडगळीच्या वस्तू, करवंट्या, गच्चीवर साचून राहिलेले पाणी, ताडपत्र्या, टायर अशा ठिकाणांची स्वच्छता ठेवणे ही आवश्यक आहे. या ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्यास डासांची उत्पत्ती वाढते. त्यामुळे आजार बळवतात, अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांसाठीही जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भित्तीपत्रके, माहिती पुस्तिकांच्या माध्यमातून सोसायटी, चाळीत, झोपडपट्टी भागात जनजागृती करण्यात येणार आहे. आयपीसीएला आॅगस्टमध्ये ५० वर्षे पूर्ण होत असल्याने पावसाळ््यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे परुळकर यांनी सांगतले.