मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत सार्वजनिकरित्या पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणारी वादग्रस्त वक्तव्ये टाळा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, संजय राऊत, नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, संजय निरूपम या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या विधानांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विनाकारण सार्वजनिक वादग्रस्त विधान टाळण्याची सूचना नेत्यांना दिल्या आहेत. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणाऱ्या चर्चा बाहेर सांगू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्र्यांना ताकीद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आता लवकरच कार्यकर्त्यांची महामंडळांवर वर्णी लागणार आहे. पुढच्या 15 दिवसात महामंडळ, समिती वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.