- संतोष आंधळे
मुंबई : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रोज किती रुग्ण बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उपचारासाठी येतात, किती दाखल करून घेतले जाते, याची सर्व माहिती थेट राष्ट्रीय वैद्यकीय आयोगातील (एनएमसी) कार्यालयाशी जोडणे बंधनकारक केले आहे. यामुळे आता जे ‘डुप्लिकेट’ रुग्ण दाखविले जात होते त्याला आळा बसणार आहे.
राज्यात एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात सरकार व महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठाची १२, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. एनएमसीने सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून त्यांच्या प्रशासनाने हॉस्पिटल व्यवस्थापन माहिती यंत्रणा ही एनएमसी डॅशबोर्डशी संलग्न करावी. ओपीडीमध्ये किती रुग्णांची तपासणी झाली, किती जणांना दाखल केले याची माहिती तत्काळ एनएमसीच्या डॅशबोर्डवर उपलब्ध होईल, असे कळवले आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, एनएमसीचे असे पत्र आले आहे. त्यांना रुग्णालयातील येणाऱ्या व दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती ऑनलाइन हवी आहे, ही माहिती त्यांच्या डॅशबोर्डशी संलग्न असेल. यापूर्वी ही माहिती आम्ही हाताने भरून देत होतो. आता ती ऑनलाइन असणार आहे.
मुन्नाभाईमधला ‘तो’ प्रसंग टळणार - काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये गाजलेला मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात एका तपासणीच्या वेळी ते आजूबाजूच्या परिसरातील लोकांना रुग्णालयाच्या बेडवर रुग्ण आहे असे भासवून झोपण्यास सांगतात. - तसे प्रसंग मात्र वैद्यकीय महाविद्यालयात या नवीन यंत्रणेमुळे घडणार नाहीत.