वीज अपघात टाळा

By admin | Published: July 3, 2017 07:09 AM2017-07-03T07:09:54+5:302017-07-03T07:09:54+5:30

मुंबई शहरासह उपनगरात सरींचा जोर वाढला असून, पावसाळ्यात वीजदुर्घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी वित्तहानीसह

Avoid electricity accidents | वीज अपघात टाळा

वीज अपघात टाळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात सरींचा जोर वाढला असून, पावसाळ्यात वीजदुर्घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी वित्तहानीसह जीवितहानीमुळे अनेक संसार उघड्यावर येतात. परिणामी, पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी, मुंबईतील प्रमुख नियंत्रण कक्षासह वीजयंत्रणाही दक्ष झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, पावसाळ्यात विजेच्या दुर्घटना घडू नयेत, म्हणून काय काळजी घ्यावी आणि वीजदुर्घटना घडल्यास त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना वीजयंत्रणांनी दिल्या आहेत. अशाच काहीशा सूचनांसह खबरदारीच्या माहितीचा खास आढावा ‘लोकमत’ने वीजग्राहकांसाठी घेतला आहे.
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो, तसेच अपघात घडण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वीजयंत्रणेवर झाड कोसळणे, फांद्या तुटून पडणे, पाणी तुंबून भूमिगत वाहिनी, फिडर पिलरमध्ये शिरणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे, विजेच्या तारांचे घर्षण, विजेचे खांब, तारा, रोहित्रांमध्ये (ट्रान्सफॉर्मर) ठिणग्या पडून होणाऱ्या बिघाडामुळे अनेक दुर्घटना घडतात. यात जीवितहानी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे असे संभाव्य धोके लक्षात घेऊन, पावसाळ्यात नागरिकांनी सतर्कता बाळगावी. एखादी घटना घडल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन बेस्ट, रिलायन्स, टाटा आणि महावितरण या वीजकंपन्यांनी केले आहे.

मेन स्विचमध्ये फ्यूज वायर असावी. घर किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये किंवा त्याच्या शेजारी असलेल्या किटक्याटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अ‍ॅल्युमिनियम अलॉय या विशिष्ट धातूची तार वापरावी. अशी फ्यूज वायर वीज भारानुसार वापरल्यास शॉकसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी अथवा दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉकसर्किट झाल्यास वीजपुरवठा खंडित होत नाही. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या विजेच्या तारा, खांब, फिडर पिलर, रोहित्रांवरीख लोखंडी कुंपण, फ्युज बॉक्स, घरातील ओलसर उपकरणे, शेती पंपावरील स्विचबोर्डकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडू शकतात. नागरिकांनी लोंबकळणाऱ्या तारांना हात लावू नये. विजेच्या खांबांना प्राणी बांधू नये किंवा दुचाकी टेकवून ठेवू नये. विशेषत: पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते, यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात यावर काही परिणाम होत नाही, पण पावसाला सुरुवात झाली की, या वाहिन्यांमध्ये पाणी शिरून वाहिनीत बिघाड होतो. पाणी शिरल्याने वाहिनीत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो, तसेच झाडे आणि वीज कोसळल्याने वीजपुरवठा खंडित होतो. काही वेळेस शॉर्टसर्किट होऊ शकते. परिणामी, जीवितहानी होण्याचाही संभव असतो. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.

ट्रान्सफॉर्मर, फिडर फिलर किंवा खांबावर शॉर्टसर्किट झाल्यावर, त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तत्काळ वीजयंत्रणेला कळवावे. याकरिता नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या नजीकच्या कार्यालयाचा, तसेच तेथील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मोबाइल क्रमांक घेऊन ठेवावा. शहरातील सोसायट्या, वस्ती भागात वायर, तारा उघड्या नसतील, याची खात्री करून घ्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सतर्कतेमुळे भविष्यातील दुर्घटना टळू शकते. त्यामुळे नागरिकांनी वीजवितरण कंपन्यांना सहकार्य करावे.

विद्युत उपकरणे खिडकी, तसेच बाल्कनी पासून दूर ठेवावीत, तसेच मीटरजवळ पाणी झिरपत असल्यास, मीटरचा मुख्य स्विच बंद करावा.
लोखंडी तारेवर कपडे वाळत घालू नयेत, तसेच ही तार विजेच्या खांबाला अथवा वीज यंत्रणेला बांधू नये, ओल्या कपड्यावर इस्त्री फिरवू नका, तसेच ओलसर हातांनी विद्युत उपकरणे हाताळू नयेत.
विजेच्या खांबाजवळ खेळू नका. विजेच्या तारांखाली ज्वलनशील पदार्थ ठेवू नका.अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून घरातील वीजयंत्रणांची तपासणी करून घ्या.
विजेचे अपघात रोखण्यात आर्थिंग महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे घरातील वीजयंत्रणेचे आर्थिंग तपासून घ्यावे.

पाणी हे विद्युत वाहक असल्याने, विजेच्या उपकरणांना पाणी लागू देऊ नका, तसेच वीज उपकरणे ओलाव्यापासून दूर ठेवावीत. विद्युत उपकरणावर पाणी पडल्यास, ते उपकरण तत्काळ बंद करून ते मूळ वीजजोडणीपासून तत्काळ दूर करावे.

Web Title: Avoid electricity accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.