मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमान वाढीमुळे मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. दुपारच्या उन्हात थंडावा मिळावा, यासाठी बहुतांश मुंबईकर थंड पाणी, पेय आणि एसीचा आधार घेत आहेत. पण अशा प्रकारे थंडावा मिळवा, पण जरा जपून, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. सरधोपटपणे या पर्यायांच्या मागे लागल्यास मुंबईकरांच्या आरोग्यास धोका असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. मुंबईच्या वाढत्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. दुपारी असलेल्या उकाड्यामुळे अनेकांच्या घशाला कोरड पडते. यावर उपाय म्हणून अति थंड पाणी प्यायले जाते. तर काही वेळा रस्त्यावरील सरबत, बर्फाच्या गोळ्यावर अनेक जण ताव मारताना दिसतात. या सर्व थंड पदार्थांचा विपरीत परिणाम घशावर होतो. सरसकटपणे असे केल्याने घसा बसून संसर्ग होतो. सतत थंड पाणी, थंड पदार्थ खाल्ल्याने भर उन्हाळ्यात सर्दी होऊ शकते. ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास असतो, या काळात थंड पदार्थ खाल्ल्याने बळावतो, असे फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी सांगितले. वाढलेल्या तापमानामुळे बराच काळ बाहेर राहिलेल्या पदार्थांमध्ये विषाणू निर्माण होतात. यामुळे अन्न खराब होते. रस्त्यावरील पदार्थांमध्ये हा परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. वडापाव, चायनिज हे आवडते पदार्थ आहेत. हे पदार्थ उघड्यावर ठेवलेले असतात. याचबरोबरीने बर्फ घातलेली शितपेये पिणे टाळावे. अशा प्रकारचे दूषित अन्न खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोटदुखी होऊ शकते. काही जणांना गॅस्ट्रोचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी कोणत्या प्रकारच्या अन्नाचे सेवन करत आहोत, याकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला फिजिशियन डॉ. वरदा वाटवे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
तापमानवाढीत अति थंड पाणी पिणे टाळा!
By admin | Published: April 22, 2015 3:40 AM