पैसे न भरल्याने मृतदेह देण्यास टाळाटाळ
By admin | Published: April 13, 2017 03:19 AM2017-04-13T03:19:07+5:302017-04-13T03:19:07+5:30
रुग्णाच्या उपचारांचे पैसे न भरल्याने नातेवाईकांना मृतदेह देण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाचे समोर आले आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने
मुंबई : रुग्णाच्या उपचारांचे पैसे न भरल्याने नातेवाईकांना मृतदेह देण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाचे समोर आले आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून याउलट रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क करुनही मृतदेह घेण्यास आले नसल्याची स्पष्ट केले आहे.
मधुमेहाने ग्रासलेल्या रमेश नाथवानी (६४) यांना उपचारासाठी १५ मार्च भाटिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. २३ मार्च रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र या उपचारादरम्यान नाथवानी यांना बेनस्ट्रोक आला. त्यानंतर २५ मार्च रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने नाथवानी यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. नाथवानी यांच्या जगण्याची शाश्वती कोणतेही डॉक्टर देत नव्हते, तसेच आर्थिकदृष्ट्याही खर्च पेलावणार नाही, त्यामुळे नाथवानी यांच्या कुटुंबाने पुढील वैद्यकीय उपचार थांबवावेत, असे रुग्णालयाला सांगितले. मात्र कायद्यानुसार आयसीयूमधील रुग्णाचा व्हेन्टिलेटर काढून टाकता येत नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता रमेश नाथवानी यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, असे भाटिया रुग्णालयाचे म्हणणे आहे. नाथावानी यांच्या वैद्यकीय उपचाराचा एकूण खर्च ६ लाख रुपये झाला. हे बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असे रुग्णालयाने सांगितले. बिलाची रक्कम भरल्यावर १ एप्रिल रोजी अठरा तासांनी मृतदेह ताब्यात दिल्याचा आरोप रमेश नाथवानी यांचे आप्तेष्ट मेहूल कटारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. रुग्णाचे कुटुंबीय संपर्क करूनही न आल्याने मृतदेह शवागृहात ठेवावा लागला. बिलासाठी मृतदेहाची अडवणूक केली नाही. तसेच कुटुंबाने कोणतेही डीएनआर अर्ज भरला नव्हता, असे रुग्णालयाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)