रेशन दुकानदारांकडून ग्राहकांना पावती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:07 AM2021-09-23T04:07:44+5:302021-09-23T04:07:44+5:30

सुहास शेलार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लाभार्थ्यांनी रेशनवर धान्य घेतल्यानंतर त्याची पावती देणे बंधनकारक आहे. मात्र, मुंबईतील बहुतांश ...

Avoid giving receipts to customers from ration shopkeepers | रेशन दुकानदारांकडून ग्राहकांना पावती देण्यास टाळाटाळ

रेशन दुकानदारांकडून ग्राहकांना पावती देण्यास टाळाटाळ

googlenewsNext

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लाभार्थ्यांनी रेशनवर धान्य घेतल्यानंतर त्याची पावती देणे बंधनकारक आहे. मात्र, मुंबईतील बहुतांश रास्त भाव धान्य दुकानदार ग्राहकांना पावती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली आहे.

शासनाकडून लाभार्थ्याला मंजूर झालेले धान्य आणि प्रत्यक्षात वितरित झालेले धान्य यातील फरक तपासण्यासाठी पावती दिली जाते. रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी २०१८ मध्ये शासनाने पावती देणे बंधनकारक केले. मात्र, अद्यापही बरेच दुकानदार वेगवेगळी करणे पुढे करीत पावती देत नाहीत. त्यामुळे यामागे धान्य चोरी करण्याचा हेतू आहे का, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

याविषयी मुंबई रेशनिंग कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष शैलेश सोनावणे म्हणाले की, बरेच दुकानदार ई-पाॅस मशीनमध्ये रोल टाकत नसल्याने पावती निघत नाही. जवळपास ८० टक्के ग्राहकांना पावती बाबत माहिती नसल्याने त्यांच्याकडून विचारणा केली जात नाही. जाणीवपूर्वक असे प्रकार केले जात असल्यामुळे धान्य चोरीची शक्यता बळावते.

माणसांचे स्वभाव हेरून दुकानदार धान्य चोरी करतात. अशिक्षित लोक, पावती बद्दल माहिती नसणारे त्यांचे हक्काचे गिऱ्हाईक असतात. मोफत धान्यसाठा पोहोचलेला नाही, तुमच्या वाटणीचे धान्य अद्याप आलेले नाही, अशा सबबी सांगितल्या जातात. महिना उलटला की धान्य देण्यास नकार दिला जातो, अशी कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

.....

अशी होते धान्य चोरी...

- प्राधान्य लाभार्थी असेल तर प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळते. समजा एखाद्या कुटुंबात पाच सभासद असतील आणि त्यापैकी दोघांनी मशीनवर अंगठा लावला नसेल (रेशनकार्ड लिंक करण्यासाठी एकदाच अंगठा लावावा लागतो) तर धान्य चोरीची संधी बळावते.

- दुकानदार संबंधित लाभार्थ्यास संपूर्ण कुटुंबाचे धान्य देण्यास टाळाटाळ करतो. याउलट पाच जणांना धान्य दिल्याची नोंद दफ्तरी केली जाते. मशीनमधून पावती निघत नसल्याने हा प्रकार ग्राहकाला कळत नाही.

- पावती न दिल्यामुळे एका कार्डवर जवळपास ५ ते १० किलो धान्य चोरी करता येऊ शकते, अशी माहिती सोनावणे यांनी दिली.

......

पावती न देणे नियमबाह्य आहे. अशा दुकानदारांना शोधून नियमितपणे कारवाई केली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. एका वेळेस ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

- प्रशांत काळे, उपनियंत्रक, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग.

.....

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर मंजूर धान्याचा तपशील दिलेला असतो. १२ अंकी रेशनकार्ड क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती मिळते. धान्य घेण्याआधी प्रत्येकाने हा तपशील तपासावा. दुकानदाराकडे पावती मागावी आणि त्यातील तफावत तपासून पाहावी.

- शैलेश सोनावणे, प्रदेश अध्यक्ष, मुंबई रेशनिंग कृती समिती.

Web Title: Avoid giving receipts to customers from ration shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.