Join us

मुंबईकरांनो! पुढील ४८ तास घराबाहेर जाणं टाळावं; हवामान खात्यानं दिला अतिवृष्‍टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 8:12 PM

अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत.

ठळक मुद्देपूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेतएखादया ठिकाणी पाणी साचले असल्‍यास त्‍याठिकाणी जाणेही टाळावे

मुंबई - भारतीय हवामान विभागामार्फत दिनांक ०४ व दि. ०५ ऑगस्‍ट २०२० रोजी मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व समुद्र किना-यांलगतचा परिसर इत्‍यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, तसेच एखादया ठिकाणी पाणी साचले असल्‍यास त्‍याठिकाणी जाणेही टाळावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन खात्‍याद्वारे करण्‍यात आले आहे.

तसेच या अनुषंगाने सुनिश्चित कार्यपध्दतीनुसार खालीलप्रमाणे कार्यावाही करण्यात आली आहे. विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला आहे. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले असून याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक उदंचन संच चालकांना देण्यात आले आहेत.

अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बेस्‍ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांची मदत पथके तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतप्‍त्‍र आहे.आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते यांच्या समन्वय अधिका-यांना मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरि‍त मदतीकरिता उघडून ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाद्वारे देण्‍यात आले आहेत.

टॅग्स :हवामानपाऊस