मुंबई : कलादिग्दर्शक राजेंद्र सापते यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या फिल्म सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियनच्या चार फरारी आरोपींना लवकरच जेरबंद करू, असे आश्वासन उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत आणि उपायुक्त स्वामी यांनी मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांना बुधवारी दिले. या संघटनेच्या कार्यालयातून या घटनेचे पुरावे नष्ट केले जाऊ नयेत यासाठी या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. मनसे चित्रपट सेनेने पत्र लिहून उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेतली.
राजेंद्र सापते यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे चित्रपट सेनेने याबाबत त्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.
राजेंद्र सापते यांच्या आत्महत्येनंतर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ आणि कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी या संघटनेचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन या सगळ्यांना दिले होते. या भेटीत त्यांनी राजेंद्र सापते यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या नरेश विश्वकर्मा ऊर्फ (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव ऊर्फ (संजुभाई), राकेश मौर्या, अशोक दुबे या चार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
मनसे चित्रपट सेनेच्यावतीने कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे लवकरच धर्मदाय आयुक्तांकडेही तक्रार दाखल करणार असल्याचे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस शशांक नागवेकर, संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर, संयुक्त सरचिटणीस संदीप सावंत, उपाध्यक्ष सचिन चव्हाण आणि उपाध्यक्ष अवधूत चव्हाण हेही उपस्थित होते.