मकरसंक्रांतीनिमित्त पक्षिमित्रांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्यासाठी धारदार मांजाचा वापर केला जातो. मात्र, या मांजामुळे मनुष्यप्राण्यांसह पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा होतात. त्यात त्यांचे मृत्यूही ओढावतात. परिणामी, अशा घटना घडू नयेत म्हणून मकरसंक्रांतीचा आनंद लुटायचा असेल आणि कोणालाही दुखापत करायची नसेल तर काळजी घ्यावी, असे आवाहन पक्षिमित्र आणि संस्थांनी केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. मोठे-मोठे प्रकल्प, मोठ्या उभ्या राहणाऱ्या इमारती आणि यामुळे होणारी झाडांची कत्तल असे अनेक घटक यास कारणीभूत आहेत. त्यामुळे येथील पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पॅरोज शेल्टरचे प्रमोद माने यांनी सांगितले. मकरसंक्रांती दिवशी उडविल्या जाणाऱ्या पतंगांसाठी धारदार मांजा वापरला जातो. यामुळे पक्षी म्हणजे चिमण्या आणि कावळे जखमी होण्याची भीती असते. घारदेखील जखमी होते. अनेकदा पतंगांचा मांजा झाडाला लटकून राहतो. यामुळेही हानी होण्याची भीती असते. परिणामी, मकरसंक्रांतीसह इतर दिवशी जखमी झालेले पक्षी आढळल्यास आम्हाला संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.