मुख्याध्यापक संघटना, शाळा व्यवस्थापनाची निर्णयाविरोधात नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला, तरीही अन्य देशांत कोरोनाची आलेली दुसरी लाट, अन्य राज्यांतील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले. यासंबंधी मुंबई पालक शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाने १८ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बालिसंह चहल यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावानुसार मुंबईतल्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून आलेल्या नवीन सूचनांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे राज्यातील नववी ते बारावीच्या ८८ टक्के शाळा सुरू झाल्या असून आता २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेतला गेला असताना मुंबईतील या निर्णयाने विरोधाभास निर्माण झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेत आजपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या मोहिमेदरम्यान काही शाळा लसीकरण केंद्र म्हणून वापरण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अद्याप असा कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. याउलट पालिका शाळांचे निर्जंतुकीकरण झाले असून लवकरच शाळा सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
* अभ्यासक्रम पूर्ण कधी हाेणार, हा प्रश्न
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मुंबईमधील शाळा नाराज असून कमीतकमी ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करायला हवे होते. कारण, मुंबईमधील मुलांचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सतत होत आहे. बोर्ड परीक्षेचा अभ्यास तसेच पूर्वतयारीसाठी फक्त तीन महिने मिळणार आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे. तसेच महापालिकेच्या वतीने आजतागायत कोणताही कोविडबाबत आदेश होऊनही शाळांना साहित्याची मदत नाही, ती त्वरित करण्यात यावी.
- प्रशांत रेडीज,
सचिव - मुंबई मुख्याध्यापक संघटना