Join us

नकारात्मक पैलूंबद्दल बोलणे टाळा, कुटुंबाला भावनिकरीत्या जोडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 1:52 AM

लोकमत मीडिया समूहातर्फे आयोजित वेबिनार ‘पुनश्च भरारी’ मालिकेत त्यांनी भाग घेतला.

मुंबई : ‘लॉकडाउन’च्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येकाचे संपूर्ण कुटुंब दिवसरात्र एकत्र राहत आहेत. यामुळे कौटुंबिक संबंध आणखी मजबूत करण्याची मोठी संधी मिळाली आहे. दुसऱ्यांमध्ये चांगल्या गोष्टी शोधण्यास प्रारंभ करा, त्यांच्या बोलण्याचे कौतुक करा आणि नकारात्मक पैलूंबद्दल बोलणे टाळा. कुटुंबाला भावनिकरीत्या जोडण्यासाठी तत्पर राहा, असे मौलिक आवाहन कृष्णा चेतना आंतरराष्ट्रीय सोसायटीचे (इस्कॉन) प्रभू गौर गोपाल दास यांनी केले.

लोकमत मीडिया समूहातर्फे आयोजित वेबिनार ‘पुनश्च भरारी’ मालिकेत त्यांनी भाग घेतला. लोकमत महामॅरेथॉनच्या प्रवर्तक रुचिरा दर्डा आणि गिरिजा ओक गोडबोले यांनी आॅनलाईन कार्यक्रमात प्रभु गौर गोपाल दास यांना बोलते केले. रुचिरा दर्डा यांंनी विचारलेल्या परस्पर संबंधांवरील एका प्रश्नावर स्टीव्ह जॉब्सचे उदाहरण देऊन गोपाल दास म्हणाले, त्यांना अ‍ॅपल कंपनीच्या मॅकिंटोश विभागातून बाहेर काढण्यात आले होते. ते दहा वर्षे कंपनीपासून दूर होते. परंतु, या कालावधीचा उपयोग त्यांनी स्वत:च्या भविष्यासाठी केला. त्यातून त्यांना जे मिळालं त्यामुळं कंपनीनं त्यांना पुन्हा बोलावून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वाने अ‍ॅपलचे नाव जगात मोठे केले. यातून संबंधांमध्ये गुंतवणूक करा, आशा आणि मानसिकता बदला, याचा धडा मिळतो.

लॉकडाउन नंतरच्या परिस्थितीबद्दल गोडबोले यांनी विचारलेल्या प्रश्नावर गोपाल दास म्हणाले, नैराश्य, घटस्फोट आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. परंतु सर्व बाबतीत महिलांचा सन्मान राखला पाहिजे. देव आपल्याला जग निर्माण करण्याचे स्वातंत्र्य देतो आणि त्यासाठी संसाधनेदेखील देतो. परंतु बºयाच वेळा आम्ही स्रोतांचा दुरुपयोग करतो. म्हणूनच आपल्याकडे प्रदूषण, जंगलतोड, आॅस्ट्रेलियन जंगलातील आग आणि कोविड-१९ साथीची रोगराईदेखील आहे. लॉकडाउनदरम्यान प्रदूषण कमी होत आहे, हवेचे शुद्धीकरण झाले आहे, पक्षी पुन्हा मुक्तपणे आकाशात संचार करीत आहेत. कारण आपण निसर्गात हस्तक्षेप करणे थांबविले आहे. देवाची सर्वात मोठी देणगी म्हणजे आपले स्वत:चे दु:ख संपवण्यासाठी योग्य ते वापरणे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.लॉकडाऊन नंतर लोकांनी त्वरित सामान्य होण्याची घाई करू नये, नाहीतर विनाशकारी त्सुनामीसारखे होईल. दैनंदिन जीवन हळूहळू रुळावर आणूया. यासाठी थोडा वेळ लागेल. ‘आज भरती और कल चक्रवर्ती, ऐसा होता नही है’ असेही ते म्हणाले.

रुचिरा दर्डा यांच्या बिझनेस लीडरविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना गोपाल दास म्हणाले, लॉकडाउनदरम्यान आणि नंतर बिझनेस लीडरने त्यांचे कर्मचारी आणि सहकाऱ्यांशी दयाळू असले पाहिजे. बॅरी वे मिलर लिमिटेड नावाच्या मध्यम आकाराच्या अमेरिकन कंपनीचेही त्यांनी उदाहरण दिले. कंपनीला २००८ च्या मंदीमध्ये आॅर्डर रद्द झाल्यामुळे १० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले होते. अध्यक्ष बॉब चॅपमॅन यांनी मंडळाची बैठक बोलावली आणि तोटा भरून काढण्यासाठी तोडगा काढण्यास सांगितले.

पहिली सूचना कामगार व कर्मचाºयांना कामावर न ठेवण्याची होती. पण बॉब चॅपमॅन यांनी ती नाकारली. ते म्हणाले, कामगारांसह आपण सर्वजण वाईट काळही सहन करू आणि त्यातून बाहेर पडू. त्याने प्रत्येकाला आठ आठवड्याच्या ‘पगाराशिवाय सुटी’वर जाण्याची सूचना केली आणि दोन दशलक्ष डॉलर्सची बचत केली. अशा प्रकारे चॅपमॅनने एकालाही गमावले नाही.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस