Join us  

असंसर्गजन्य आजारांना आळा घाला

By admin | Published: September 08, 2016 6:13 AM

असंसर्गजन्य आजारांचा धोका दक्षिण-पूर्व आशियातील देशांत वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या असंसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे

मुंबई: असंसर्गजन्य आजारांचा धोका दक्षिण-पूर्व आशियातील देशांत वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या असंसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. असंसर्गजन्य आजारांना वेळीच आळा घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारांवर उपचार मिळावेत, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड या दक्षिण-पूर्व आशियाई देशांत असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येमुळेही मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, श्वसनाचे आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या असंसर्गजन्य आजारांमुळे दरवर्षी ८५ लाख रुग्णांचा मृत्यू दक्षिण-पूर्व आशियात होत आहे. हा आकडा खूप मोठा आहे. त्यामुळे या भागात आता असंसर्गजन्य आजारांची साथ पसरत आहे. २०३० पर्यंत यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण एकतृतीयांश कमी करण्याचे ध्येय संघटनेने ठेवले आहे. त्यासाठी सर्व पातळ््यांवर उपाययोजना व्हायला हव्यात, असे संघटनेचे म्हणणे आहे. असंसर्गजन्य आजारांचा आर्थिक व्यवस्थेवर आणि वैद्यकीय क्षेत्रावर बोजा वाढत असून, पुढील काही वर्षांत हा बोजा अधिक वाढण्याचे चिन्ह आहे. त्यामुळे याला वेळीच आळा घालण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये संसर्गजन्य साथीच्या आजारांवर लक्ष केंद्रित केले आहे, पण आता असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यावर उपचार झाले पाहिजेत. लवकर निदान करण्याची व्यवस्था या केंद्रावर उपलब्ध झाल्यास या आजारांना आळा घालणे शक्य होईल, असे मत दक्षिण-पूर्व संघटनेच्या रिजनल संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)