मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत काही मतदारसंघात विलंब झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विशेषतः मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ आणि बीड लोकसभा मतदारसंघात मतमोजणी वेळी गोंधळ झाला होता.
यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे काही तक्रारीही आल्या होत्या. असा गोंधळ विधानसभा निवडणुकीत होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.
याविषयी झाली चर्चा
लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची आकडेवारीही विलंबाने जाहीर केली होती. काही जिल्ह्यातून ही आकडेवारी उशिरा आल्याने एकत्रित आकडेवारी जाहीर करण्यास विलंब झाला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत हा विलंब टाळावा आणि तत्परतेने आकडेवारी मुख्यालयाकडे पाठवावी, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था, मतदान आणि मतमोजणी केंद्रातील सुविधा, स्टेशनरीची पूर्तता याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.