मराठी पाट्यांसाठी टाळाटाळ, १५०० दुकानदारांवर गंडांतर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:12 AM2023-12-12T10:12:43+5:302023-12-12T10:13:53+5:30

महानगरपालिकेच्या पथकाच्या २० हजार दुकानांना भेटी.

Avoidance for Marathi plates 1500 shopkeepers are being slandered in mumbai | मराठी पाट्यांसाठी टाळाटाळ, १५०० दुकानदारांवर गंडांतर ?

मराठी पाट्यांसाठी टाळाटाळ, १५०० दुकानदारांवर गंडांतर ?

मुंबई : दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत तब्बल ९५ टक्के पाट्या मराठीत आढळून आल्या आहेत.  सोमवार ११ नोव्हेंबरपर्यंत पालिका पथकांनी ३० हजारांहून अधिक दुकानांना भेटी दिल्या असून, त्यामध्ये १५०० हून अधिक दुकाने आणि आस्थापनांवर मराठीत पाट्या नसल्याने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. भेटी दिलेल्या दुकाने आणि आस्थापनांमध्ये २८ हजारांहून अधिकांनी मराठी पाट्यांच्या तरतुदींची अंमलबजावणी केली आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२ च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ क या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. पालिकेने २८ नोव्हेंबरपासून न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू केली आहे. ११ डिसेंबरपर्यंत पालिकेच्या पथकांकडून सर्व २४ विभागांमध्ये तब्बल ३० हजार ४७४ दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात देवनागरी लिपीत २८ हजार ९५९ पाट्या आढळून आल्या असून, १५१५ दुकाने व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिकेच्या भेटी सुरूच राहणार :

पालिकेच्या पथकांच्या कारवाईवर मराठी पाट्यासंदर्भात अद्याप ५ टक्के दुकानदार बेफिकीर असल्याचे समोर येत आहे. या कारणास्तव पालिकेची प्रत्येक वॉर्डातील कारवाई ही पुढेही सुरूच राहणार आहे. या कारवाईसाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. कारवाईसाठी ७५ निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

Web Title: Avoidance for Marathi plates 1500 shopkeepers are being slandered in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.