Join us

मालमत्ता कर थकविणा-या सेव्हन हिल्सला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:13 AM

मुंबई महापालिकेने दिलेल्या मुदतीतही मालमत्ता कर चुकता न करणा-या, अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय व्यवस्थापनाच्या प्रशासकीय कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने दिलेल्या मुदतीतही मालमत्ता कर चुकता न करणा-या, अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय व्यवस्थापनाच्या प्रशासकीय कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. त्यांनी महापालिकेचा तब्बल ९ कोटी रुपये मालमत्ता कर थकविला आहे.अंधेरी, मरोळ येथील कर्करोगाचे रुग्णालये बंद पडल्यानंतर, त्या ठिकाणी सेव्हन हिल्स हेल्थ केअर प्रा. लि. या कंपनीला ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर, या ठिकाणी सेव्हन हिल्स रुग्णालय बांधण्यात आले होते. मात्र, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कराची थकित रक्कम भरलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या करनिर्धारक व संकलन विभागाने सेव्हन हिल्स रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती.त्यानुसार ही थकीत रक्कम भरण्यासाठी व्यवस्थापनाला २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, ही मुदत संपली, तरी व्यवस्थापनाने ९ कोटी रुपये महापालिकेकडे जमा केले नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाने या रुग्णालयाच्या प्रशासकीय कार्यालयातील कर्मचा-यांना बाहेर काढून प्रशासकीय कार्यालय सील केले आहे.>..म्हणून केली कारवाई सेव्हन हिल्स रुग्णालयाने ३९ कोटी रुपये थकविले आहेत. मात्र, याबाबतच्या वादावर अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यामुळे ही थकीत रक्कम त्वरित जमा करण्याची सूचना पालिकेने रुग्णालय व्यवस्थापनाला केली होती. ही रक्कम भरण्याची त्यांनी तयारही दाखविली होती. मात्र, वारंवार नोटीस पाठवूनही ही रक्कम रुग्णालय व्यवस्थापनाने जमा न केल्यामुळे महापालिकेने अखेर कारवाई केली.